वर्धा : आपली प्रतिमा उजळण्यासाठी अब्जावधी खर्च करता, भांडवलदारांना पोसण्याचे कामही तुम्ही करता, मात्र शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच तुमची सरकारी तिजोरी रिकामी कशी असते? सामाजिक आंदोलनांची दडपशाही करणारे हे नकली राष्ट्रभक्तांचे सरकार आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ पुरोगामी नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी प्राचार्य दिनकर मेघे स्मृती व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना केली. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात ‘वर्तमानकालीन राजकारण आणि सामाजिक आंदोलनांचे भवितव्य’ या विषयावर त्यांनी परखड विचारांची मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले तर अतिथी म्हणून सविता मेघे, अॅड. नत्थु ढेंगरे, प्राचार्य अॅड. अशोक पावडे उपस्थित होते. वर्तमानकालीन स्थित्यंतरांवर भाष्य करताना वृंदा करात म्हणाल्या, सरकारला सवैधानिक जाबाबदाऱ्यांचे भान ठेवावे लागते, याची जाणीवच सरकारला नाही. मोदी सरकार केवळ एक मुखवटा आहे, हा देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवित आहे. स्त्री स्वातंत्र्य नाकारणारे, अल्पसंख्यांकांचे हक्क नाकारणारे आणि ज्यांचा दुरान्वये स्वातंत्र्यलढयाशी संबंध नव्हता, असे श्यामप्रसाद मुखर्जी आज सरकारचा आदर्श झाले आहेत. कधी पोषाखावरुन तर कधी धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर स्त्रियांना हीनत्व देणाऱ्या घटकांविरुद्धही पुन्हा व्यापक लढा उभा करण्याची वेळ आली आहे. जगभरातील भांडवलशाही देश आपल्याच नागरिकांना रोजगार देऊ शकत नाहीत तर इथल्या तरुणांना संधी कशी मिळेल? उलट भारतीयांना आपल्या देशात परत पाठविणे सुरू झाले आहे. भारतात गुंतवणुकीची कुणाचीच मानसिकता नाही.
आंदोलनांची दडपशाही करणारे सरकार
By admin | Updated: October 25, 2016 02:03 IST