वर्धा : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल तर सोयाबीन ३५०० प्रती क्विंटल आहे. या दरात कापूस व सोयाबीन विकून शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कापसाला सात हजार तर सोयाबीनला साडेचार हजार भाव देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली. सभेच्या विदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची सभा कार्यालयात यशवंत झाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेकरिता राज्य सचिव किसन गुजर राज्य अध्यक्ष दादा रायपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी वर्षभर कुटुंब कसे चालविणार हा प्रश्न आहे. स्वामिनाथन कमीशनच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च व ५० टक्के नफा जोडून सर्व शेतमालाचे उत्पादन दर केंद्र सरकारने जाहीर करावे व त्या दरात शेतमालाची सरकारी खरेदीची व्यवस्था शासनाने करावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे कापसाला ७००० रूपये व सोयाबीनला ४५०० रूपये भाव मिळावा, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना ४५०० रूपये प्रती शंभर किलोचे दरात मिळावे, रासायनिक खते व बियाणे शेतकऱ्यांना सवलतीचे दरात मिळावे, ग्रामीण भागात मजुरांना शेतीत मजुरी नसल्याने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. याप्रसंगी यशवंत झाडे म्हणाले, मागील दहा वर्षात शेतीला लागणारे सर्व प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते, फवारणी, औषधे, मजुरांची मजुरी, जनावरांचा चारा, प्रवास खर्च, वीज बिल पाच ते दहा पटीने वाढले. मात्र उत्पादित शेतमालाचे हमी दर मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येकच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करीत असतो. मात्र या भांडणात शेतकरी आत्महत्या, भारनियमन, शेतमालाचा दरवाढीचा प्रश्न कायम आहे. अशा स्थितीत सर्व शेतकरी बांधवांनी संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले. १ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यात जिल्हा कचेरी समोर धरणे, मोर्चे, करण्याचा व १६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर हिवाळी अधिवशेनावर शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा काढण्याचा ठराव शंकरराव दानव यांनी मांडला. यावेळी गोपाळ गाळकर, गणेश खिरोडकर, ज्ञानेदेव तायडे, देविदास राऊत, सुभाष खांडेकर, चंद्रभान नाखले, गणपत मेंढे, मारोतराव तलमले, जानराव नागमोते, अरूण बारई, संध्या संभे, कैलास डोंगरे, शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, पुष्पा धुर्वे, भोयर, सुरेश कुकडे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
सोयाबीनला साडेचार तर कापसाला सात हजार भाव द्या
By admin | Updated: November 19, 2014 22:46 IST