मागणी : किसान मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी किसान मोर्चाने केली़ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले़निवेदनात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही विदर्भातील जाहीर सभांमध्ये देण्यात आली होती़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र सरकारांना वारंवार निवेदने देऊनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. या पॅकेजग्रस्त जिल्ह्यातील वर्धा व बुलढाणा जिल्हा सरकारी बँका डबघाइस आल्यात़ शेतकऱ्यांकडे या बँकांची किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत़ या आत्महत्यांना नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला अत्यंत कमी भाव व चुकीचे कृषी धोरण कारणीभूत आहे. या जिल्ह्यात सिंचन ४ टक्के आहे. यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्या, अशी मागणी प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या
By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST