वर्धा : पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये शौचालयाच्यावर असलेल्या कप्प्यावर गांजा असल्याची माहिती नागपूर येथील रेल्वे पोलिसांना मिळाली. यावरून सदर पोलिसांनी नागपूर येथून गाडीत चढून तपासणी केली असता जनरल बोगीतून सुमारे १०० किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई वर्धा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पुरी- अहमदाबाद ही गाडी ओडिसातून निघून अहमदाबाद येथे जात होती. या गाडीत गांजा असल्याची माहिती नागपूर येथील रेल्वे पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन नागपूर रेल्वे पोलीस गाडीत चढले. त्यांनी गाडीची तपासणी सुरू केली असता गाडीच्या शेवट असलेल्या जनरल बोगीतील शौचालयाच्यावरील कप्प्यात गांजा आढहून आला. हा गांजा जप्त करून गाडी वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता तो खाली उतरविण्यात आला. हा गांजा विविध वजनाच्या प्लास्टिक थैलीत असल्याचे दिसून आले. यातील काही पॅकिंगचे वजन दोन किलो तर काही थैल्यांचे वजन अर्धा किलो असल्याचे मोजमाप केले असता दिसून आले. या कारवाईत रेल्वे पोलिसांनी एकूण १०० किलो गांजा जप्त केल्याचे सांगितले. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली असून रेल्वे पोलिसांच्या कारवाईअंती तो शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. या गाडीतून नेहमीच गांजा येत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. हा गांजा ठरलेल्या ठिकाणी बरोबर उतरविण्यात येणार होता. मात्र याची माहिती रेल्वे पोलिसांना वेळीच मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. हा गांजा कोणत्या गावी जात होता याचा खुलासा अद्याप झाला नाही.(प्रतिनिधी)
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून गांजा जप्त
By admin | Updated: September 27, 2014 02:03 IST