हिंगणघाट : शहराचे विद्रुपीकरण थांबविणे, रहदारीसाठी रस्ता मोकळा करणे तसेच शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे़ बुधवारी शहरातील अतिक्रमणावर ‘गजराज’ चालणार आहे़ प्रशासनाने अतिक्रमण विरोधी पथकाची निर्मिती करून पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे़प्रत्येक वेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही दिवसांसाठी अतिक्रमण हटविले जाते. मोहीम थंड झाल्यानंतर पुन्हा तीच स्थिती निर्माण होते. हे कालचक्र थांबविण्यासाठी नगर पालिकेने तसेच अन्य विभागांनी संयुक्तरित्या कायम व्यवस्था निर्माण करून अतिक्रमण थांबविण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी अतिक्रमण विरोधी पथक तयार करून कायमची व्यवस्था राखावी आणि पुन्हा-पुन्हा तो प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पालिकेने तशी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे. गत अनेक दिवसांपासून शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते. अनेक रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले तर अनेक ठिकाणी खुलेआम रस्त्यावरच ठेले, दुकाने थाटायला प्रारंभ झाला़ नागरिकांच्या याविरूद्ध सतत वाढणाऱ्या तक्रारी, रहदारीची वाढत्या समस्या लक्षात घेऊन तसेच शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. यासाठी पालिकेने १० फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी स्वत:च अतिक्रमण हटवावे, अशी सूचना दिली आहे़ यानंतर पालिका कारवाई करेल, असेही जाहीर करण्यात आले़ शहरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई नगर परिषदेने पारदर्शकरित्या पार पाडावी, अशी रास्त अपेक्षा नागरिकांद्वारे व्यक्त होत आहे़(शहर प्रतिनिधी)
स्वच्छ शहरासाठी अतिक्रमणावर चालणार गजराज
By admin | Updated: February 11, 2015 01:41 IST