उत्तम गल्वा स्टील कंपनीतील कामगारांच्या उपोषणाचा चौथा दिवस वर्धा : उत्तम गल्वा कंपनी प्रशासनाने कमी केलेल्या कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. या आंदोलनाला गुरुवारी चार दिवसांचा कालावधी होत होत आहे. आतापर्यंत चार उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपोषणाला बसलेल्या कामगारांना कंपनीने सन २०१० पासून कामावरून कमी केले. या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व कामगारांना कंपनीने कामावरती घ्यावे, या एकाच मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने वर्धा शहर प्रमुख तुषार देवढे यांच्या उपस्थितीत दादा बोरकर, घनश्याम बोडाखे, नितीन काटकर, गणेश कथलकर, चेतन वानखेडे, रवी माहुरे, गजानन वनकर, विजय रघाटाटे, नितीन ढवळे यांनी उपोषण सुरू केले आहे. यातील चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. यातील दोघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून घनश्याम बोडाखे व विजय रघाटाटे या दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
चार उपोषणकर्ते रुग्णालयात
By admin | Updated: August 5, 2016 02:01 IST