आणखी एक तक्रार : ११ जणांवर गुन्हे दाखल पवनार : जुना वाद उकरून काढत दोन गटात झालेल्या संघर्षामुळे गावात तणावपूर्वक शांतता आहे. यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण गावात गस्त घालण्यात येत आहे. वाद निर्माण करून झालेल्या हाणामारीतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आरोप असलेल्या एकूण १२ जणांनी पोलीस ठाणे गाठत अटक करून घेतली आहे. यातील एका अल्पवयीन युवकाला पूर्वीच सोडण्यात आले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर यातील जखमी राहुल पाटणकर यांचे वडील गजानन पाटणकर (६४) रा. पवनार यांनी गुरुवारी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून महेश राऊत, विशाल शंभरकर, अविनाश पाटोळे, संदीप लाखे, सचिन साटोणे, रूपेश वानखेडे, विनोद मुंगले, गजानन जाधव, गणेश खेलकर, पंकज नेहारे, गोविंद मुंगले या ११ जणांवर भांदविच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत थोडक्यात वृत्त असे की, येथील एका लग्नप्रसंगात अमोल थूल व विशाल शंभरकर यांच्यात आठ दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झाली होती. ते प्रकरण चिघळत जावून हाणामारीपर्यंत पोहचले. आरोपी असलेले किरण गोमासे हे शिवसेनेचे शाखा अध्यक्ष व तंटामुक्त समितीचेही अध्यक्ष आहेत. तर मारहाणीत जखमी झालेले विशाल शंभरकर व महेश राऊत हे बजरंगदलाचे कार्यकर्ते आहे. त्यांच्यातील वाद प्रत्यक्ष राजकीय नसला तरी याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहे.(वार्ताहर)
‘त्या’ वादातून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
By admin | Updated: May 27, 2016 01:53 IST