वर्धा : घरगुती वादातून मुलाच्या डोक्यावर बैलबंडीची उबारी मारून हत्या केल्या प्रकरणी कारंजा तालुक्यातील साहेबराव नामदेव पाटे याला पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील जिल्हा न्यायाधीश अनिरूध्द चांदेकर यांनी शुक्रवारी दिला. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, २६ जून २०१३ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास साहेबराव व त्याचा मुलगा महेश (२१) घरी झोपले होते. या दोघांत यापूर्वी वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्याकरिता साहेबराव याने महेशच्या डोक्यावर प्रहार केला. साहेबराव याला मारहाण करताना त्याच्या पत्नीने पाहिले. जखमी झालेल्या महेशला प्रथम कारंजा (घा.) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. २४ जुलै २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला. महेशची आई आशा पोटे हिने २७ जुलै २०१३ रोजी कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेच्या तपास करून ए.एम. भाजीपाले यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदर प्रकरण न्यायदानाकरिता न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांच्या न्यायालयात आले. यावेळी शासकीय अभियोक्ता अनुराधा सबाने यांनी एकूण १४ साक्षदार तपासले. संपूर्ण साक्षदारांच्या साक्ष पुराव्याच्या आधारे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेता न्यायाधीशांनी आरोपी साहेबराव पोटे याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जमादार ढोणे यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर ठेवण्याची कामगिरी चोख बजावली. (प्रतिनिधी)
मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला पाच वर्षे सश्रम कारावास
By admin | Updated: March 21, 2015 02:05 IST