लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांनी वेळीच या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने या कोल्ह्याचे प्राण वाचविणे शक्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता उघड झाली.तळेगाव (टालाटूले) येथील गजानन पोहणे यांच्या शेतातल्या विहिरीत कोल्हा पडून असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती पिपल्स फॉर अॅनिमल्सच्या चमूला दिली. माहिती मिळताच पिपल्स फॉर अनिमल्सच्या सदस्यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. कोल्हा हा प्राणी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो. यातच विहीर खोल आणि पाऊस यामुळे कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढणे अवघड जात होते. शेवटी पिपल्स फॉर अनिमल्सचे सुमित जैन व कौस्तुभ गावंडे यांनी ५० फूट खोल विहिरीत दोराच्या मदतीने उतरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रयत्न करून या कोल्ह्याला पकडून सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले. हा कोल्हा सुदृढ असल्यामुळे त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. या कार्यात वर्धा वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहायक यु.व्ही शिरपूरकर, बिटगार्ड विजय कांबळे, बी.डब्लू. इंगळे, भैया मुके, पिपल्स फॉर अॅनिमल्सचे रोहित कांगले, दर्शन दुधाने यांनी सहकार्य केले.
गावकऱ्यांच्या दक्षतेने वाचले कोल्ह्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:33 IST
तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले.
गावकऱ्यांच्या दक्षतेने वाचले कोल्ह्याचे प्राण
ठळक मुद्देतळेगाव (टा.) येथील घटना : भर पावसात पिपल्स फॉर अॅनिमलचे रेस्क्यू आॅपरेशन