ग्रामीण भागातील वास्तव : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढवर्धा : सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. जिल्ह्यातील मजूर अधिक पैसे मिळत असल्याने बाहेर जिल्ह्यात जात आहे. यामुळे या शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील मजूर आणावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात अधिक दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत.जिल्ह्यातील सेलू, आर्वी, आष्टी, देवळी, कारंजा, पुलगाव, हिंगणघाट, समुद्रपूर या आठही तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यास शेतात कापूस मोठ्या प्रमाणावर असल्याने शेत पांढरी दिसत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून मजुरांअभावी कापूस वेचणीचे कामच होत नसल्याचे दिसून येत आहे. आधीच शतीमालाला योगय तो भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना आता शेतात माल येऊनही केवळ मजुरांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मजुरीचे दर वाढूनदेखील आणि गावासह परिसरतील गावांमध्ये फिरूनदेखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.सध्या कापूस वेचणी सहा ते सात रुपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी आपला माल वेचणीसाठी मजुरांकडे चकरा घालताना आढळून येतात. सहा ते सात रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी व बाहेरगावाहून मजूर ने-आणचा खर्च पाचशे ते हजार रुपयांच्या जवळपास येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक परवडेनासे झाले आहे. मजूर मिळणे अवघड होऊन बसल्याने शेतकऱ्यांची वेचणी रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या शेतात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. बाजारात कापूस व अन्य शेतमालाला कमी भाव आहे. यामुळे शेतात उगविलेले उत्पन्न गोळा करून बाजारात पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दिसत आहेत.
कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर
By admin | Updated: November 27, 2015 02:20 IST