जुथिया जिवाणी : शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन कार्यशाळावर्धा : केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील सर्व साधारण लोकांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ नये त्याकरिता ‘आर्थिक साक्षरता’ यासारखी कार्यशाळा राबविणे ही काळाची गरज आहे. मत भारतीय रिजर्व बँकेच्या क्षेत्रीय निदेशक जूथिया जिवाणी यांनी व्यक्त केले.भारतीय रिजर्व बँकद्वारे हिंदी विद्यापीठात आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे आयोजन केले होते. कमलनयन बजाज फाऊंडेशनद्वारे संचालित बचत गट, बँक आॅफ इंडिया द्वारे संचालित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानचे प्रशिक्षणार्थी, हिंदी विद्यापीठाचे शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून जिवाणी बोलत होत्या. आरबीआयचे उपमहाप्रबंधक कामेश्वरराव, विदर्भ क्षेत्राचे प्रबंधक रमेश कदम, उप महाप्रबंधक एस.व्ही. सातपुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा, जन-धन, जीवन ज्योती सुरक्षा, अटल पेंशन, मुद्रा आदी योजनांविषयी सविस्तर माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी दिली. शेती विषयक विविध योजनांची सविस्तर माहिती नाबार्डच्या डीडीएम डॉ. स्रेहल बंसोड, स्वरोजगार प्रशिक्षण कार्याची माहिती निदेशक अनिल पाटील, वित्तीय समावेशन समुपदेशन केंद्र वर्धा (अभय) च्या कार्याची माहिती अशोक गवई, तसेच आर्थिक व्यवहारात नकली नोटा कशा ओळखाव्यात याची माहिती रिजर्व बँकेचे एल.एस. भाटी यांनी दिली. याप्रसंगी सिव्हील रोड, वर्धा येथे निसर्ग सेवा समितीच्या सहयोगाने मुख्य अथितींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन व आभार भारतीय रिजर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक नीता गेडाम यांनी केले. कार्यशाळेला भारतीय रिजर्व बँकेचे पदाधिकारी, अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी बुद्धदास मिरगे, मुरलीधर बेलखोडे, अमोल वैद्य, रिजर्व बँकेचे कर्मचारी आदींंनी सहकार्य केले. युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
आर्थिक साक्षरता कार्यशाळा ही आजच्या काळाची गरज
By admin | Updated: January 14, 2016 02:50 IST