आकोली : भारत विकास गू्रप व शासनाच्या संयुक्त पुढाकाराने तात्काळ आरोग्य सेवा ही योजना सुरू करण्यात आली. यात खरांगणा विभागासाठी नेमण्यात आलेल्या इमर्जंन्सी मेडीकल आॅफीसरची पदवी बनावट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांची पदवी तपासली असता ती खोटी असल्याचे समोर आले आहे. यावरून सदर डॉक्टरला या योजनेतून निलंबित करण्यात आले आहे. शासनाने ग्रामीण जनेतेला तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी म्हणून ‘१०८ डायल करा अॅम्बुलन्स आपल्या दारी’ ही अभिनव योजना सुरू केली. या योजनेत सर्व सोर्इंनी युक्त एक रुग्णावाहिका, एक सहायक व एका प्रशिक्षित डॉक्टरची नेमणूक राहणार आहे. ग्रामीण जनेतला आरोग्य विषयक तत्काळ सेवा देणे हा मुळ हेतू होता; पण खरांगणा येथे प्रत्यक्षात अप्रशिक्षित व्यक्तीची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. एमबीबीएस किंवा बीएएमएस ही पात्रता असताना खरांगणा विभागासाठी नेमण्यात आलेले इमर्जंन्सी मेडीकल आॅफीसर विशाल गोडगोणे हे प्रत्यक्षात इलेक्ट्रो होमीओपॅथीधारक असून त्यांना नावापुढे डॉक्टर लावण्याचीही मनाई आहे. असे असताना त्यांची इमर्जंन्सी मेडीकल आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली. वैद्यकीय विभागाचा हा अनागोंदी कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. या वृत्तामुळे जाग आलेल्या प्रशासनाने सादर करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी केली. यात बीएएमएसची डिग्री खोटी असल्याचे सिद्ध झाले. त्यावरून विशाल गोडगोणे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
अखेर तत्काळ सेवेतील वैद्यकीय अधिकारी निलंबित
By admin | Updated: November 25, 2014 23:00 IST