चिमुकल्यासह पती-पत्नी जखमी : पाच लाखांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हिंगणघाटकडे जाणारा भरधाव कंटेनर आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल खाली उतरताना अनियंत्रित होऊन बोरगाव (मेघे) येथील सहस्त्रबुद्धे यांच्या घरात शिरला. या घटनेत अकरा वर्षीय चिमुकल्यासह पती-पत्नी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडला. मनोज सहस्त्रबुद्धे, शिल्पा सहस्त्रबुद्धे व ओजस सहस्त्रबुद्धे सर्व रा. बोरगाव (मेघे), अशी जखमींची नावे आहे. तीघेही रात्री घरी झोपून होते. दरम्यान, अचानक घराच्या भिंतीवर काहीतरी आदळल्याचा आवाज झाला. काही कळण्यापूर्वीच अंगावर साहित्य कोसळल्याने तिघेही जखमी झाले. भरधाव कंटेनर घरात शिरल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. हिंगणघाटकडे जाणारा कंटेनर क्र. सी.जी. ०४ जे.सी. ३४४८ उड्डाणपूल उतरत असताना अनियंत्रित झाला. यामुळे कंटेनर थेट सहस्त्रबुद्धे यांच्या घरात शिरला. यात त्यांच्या घराच्या भिंतीसह छत तुटले व साहित्याची नासाडी झाली. यात त्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले. माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन.यू. खेकाडे, प्रमोद जांभुळकर, गौळकर व मार्शल पथकाने घटनास्थळ गाठत पंचनामा केला. शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवित कंटेनर चालक शैलेंद्र ओमप्रकाश यादव (२५) रा. नागपूर याला ताब्यात घेतले.
भरधाव कंटेनर शिरला घरात
By admin | Updated: June 22, 2017 00:40 IST