हमीपत्रही भरून घेणार : लाखो रूपयांचा महसूल जातो पाण्यात तळेगाव (श्या.पंत): गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना लगाम घालण्यासाठी शासनाने आता दंडाची रक्कम बाजारभावाच्या प्रतिब्रास पाचपट केली आहे. त्याच बरोबर अवैध उपसा करणार नाही असे हमीपत्र संबंधीत मालकांकडून घेण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला आहे. तालुक्यात गौण खनिजांचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा करून वाहतूक सुरू आहे. परिणामी शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. शिवाय अनेक ठिकाणी नदी काठावरील भूजल पातळी खालावत चालली आहे. गौण खनिजांचा अवैध उपसा व वाहतूक करणारे वाळू तस्कर गावोगावी निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत गौण खनिजाचा अवैध उपसा व वाहतूक करणारी वाहने पकडल्यास संबंधितांकडून बाजारभावाच्या तीन पट प्रति ब्रास दंड वसूल करून गौण खनिज व वाहने सोडून देण्यात येत होती. बाजारभावाच्या तीन पट दंड आकारण्यात येऊनही गौण खनिजाचा अवैध उपसा व वाहतुकीवर काहीच परिणाम दिसत नव्हता. उलट मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा होतच आहे. या अवैध उपस्यावर व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन अध्यादेश जाहीर केला आहे. या नव्या अध्यादेशानुसार अवैध खनिजाचा उपसार करणे, वाहतूक करणे वा विल्हेवाट लावलेल्या गौण खनिजाच्या बाजार मुल्याच्या प्रति ब्रास पाच पट दंड आकारण्यात येऊन हे गौण खनिज सरकारजमा करण्यात येणार आहे. आष्टी तालुक्यातील भिष्णूर-भारसवाडा, गोदावरी रेती घाटावरून दररोज हजारो ट्रीप रेतीचे अवैधरित्या उत्खनन होत आहे. रेतीमाफिया पैसे वाचविण्यासाठी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करीत असल्याने हा अद्यादेश काढण्यात आला आहे.(वार्ताहर)
वाळू तस्करांवर आता पाचपट भुर्दंड
By admin | Updated: July 25, 2015 02:21 IST