वर्धा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांना रासायनिक खातांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परंतु रेल्वेच्या माध्यमातून सोमवार वर्धा रेल्वेस्थानकावर आलेला खतसाठा सततच्या पावसामुळे भिजला. याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला व कृषी विभागाला बसला आहे.शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी शासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहेत. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. काही वर्षापासून गोधन कमी झाल्यामुळे शेणखताचे प्रमाण कमी झाले आहे. उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी साहजीकच बळीराजादेखील रासातनिक खतांना प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उणीव भासू नये याकरिता मोठ्या प्रमाणात खतसाठा आणला जातो. खतासाठा जिल्ह्यात आणण्यासाठी रेल्वेचे माध्यम अत्यंत सुरक्षित असल्याचे समजले जाते. सोमवार’ वर्धा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर मालधक्क्यावर हा रासायनिक खताचा साठा उतरविण्यात आला. सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात या खतसाठ्याला पावसापासून बचावार्थ त्यावर ताडपत्री टाकण्यात आल्या. पण खतसाठा जास्त असल्यामुळे सर्व खतासाठा झाकण्यात येवू शकला नाही. त्यातच टाकण्यात आलेल्या ताडपत्र्या हवेमुळे उडाल्या. परिणामी खतसाठा मोठ्या प्रमाणात भिजला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या खतसाठ्यामध्ये डीएपी, १५.१५.१० तसेच यरिया खतांचा समावेश होता. शेतकऱ्यांना रासायनिक खतांसाठी करावी लागणारी धावपळ पाहता खतांचा पावसापासून कसा बचाव करता येईल, याकरिता रेल्वे प्रशासनाने सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी)
खतसाठा पावसाने भिजला
By admin | Updated: August 8, 2015 02:27 IST