वर्धा : जवळपास १५ वर्षांपासून शेतात असलेल्या विहिरीच्या जवळच दुसरी विहीर खोदून त्यात आडवे बोअर मारून त्या विहिरीतील पाणी आपल्या विहिरीत ओढून घेण्याचा प्रकार सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) पाहावयास मिळाला. या प्रकरणी अशी बोअर खोदून पाणी ओढत असलेल्या किशोर श्रीराम बोरकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी विजय पुसाराम बोरकर याने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आपल्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. सिंदी (रेल्वे) येथील विजय पुसाराम बोरकर याचे मौजा डोरली, सर्वे नं.१०९, आराजी ४.५ हे.आर. येथे शेत आहे. शेतात १५ वर्षांपासून विहीर असून त्यातील पाण्याच्या भरवशावर ते शेतीचे ओलीत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. विजयच्या शेताला लागूनच किशोर श्रीराम बोरकर याचे शेत आहे. त्याने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून स्वत:च्या शेतात विजय बोरकर याच्या विहिरीपासून केवळ १०० फुट अंतरावर विहीर खोदली आणि विहिरीच्या आत विजयच्या विहिरीच्या दिशेने आडवे बोर मारून त्याच्या विहिरीतील संपूर्ण पानी आपल्या विहिरीत ओढून घेतले. त्यामुळे विजय पुसाराम बोरकर यांची विहीर कोरडी पडली. या कारणाने विजयला ओलित करताना अडचण येत आहे. सदर प्रकरणाची तक्रार वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्धा व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच वारंवार या संदर्भात विजयने पाठपुरावा केला. तरीही विजयच्या मागणीकडे अद्याप लक्ष करण्यात आलेले नाही. शेतात खोदलेल्या विहिरीपासून ५०० फुटाच्या आत भूजल अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार दुसऱ्या विहिरीचे खोदकाम अथवा बांधकाम करता येत नाही. हा नियम धाब्यावर बसवून किशोर बोरकर याने विजयच्या जुन्या विहिरीच्या १०० फुट जवळच विहिर खोदली. मुळात ही विहीर खोदणेच नियमाला धरून नाही. त्यावरही किशोरने आपल्या विहिरीतून विजयच्या विहिरीच्या दिशेने आदवे बोअर मारून त्याच्या विहिरीतील पाणी आपल्या विहिरीत ओढून घेतले. किशोर बोरकर याचे विहिरीचे खोदकाम व बांधकाम हे बेकायदशीर आहे. त्यामुळे ती विहीर त्वरित बुजविण्यात यावी, या संदर्भात विजय याने संबंधित अधिकाऱ्यांना ९ मे २०१३ पासून अनेक लेखी तक्रारी दिल्या आहेत. परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे विजयचे नुकसान होत आहे. शेतातील पाणीच ओढून घेण्यात येत असल्याने त्याला आपल्या शेतात ओलित कसे करावे हा प्रश्न पडला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने हा त्रास जाणवत नाही. पण पावसाळा सरताच पाण्याची पातळी खालावल्यावर अडचणी येत असल्याने त्याचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही सम्बंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुुळे विजयने पुन्हा एकवार जिल्हाधिकारी एन नवीन सोना यांना आणि इतरही अधिकारी वर्गाला निवेदन देऊन सदर शेतकऱ्याची विहीर बिजवावी आणि आपले होत असलेले नुकसान थांबवावे, अशी मागणी केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)
विहीर वाचविण्यासाठी शेतकऱ्याची पायपीट
By admin | Updated: July 22, 2014 00:00 IST