लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : गतकाही महिन्यांत समुद्रपूर पोलीस ठाण्यांंतर्गत चोऱ्या, गोळीबार यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरले. मे महिन्यात धुमनखेडा व बेलघाट येथे शंकर बोरेकर यांच्या घरी चोरी झाली. या चोरीत १८,५०० रुपयांचा ऐवज पळविला तर जून महिन्यात मेनखात येथे मोहन मंगरुळकर यांच्या घरी १.५० लाख रुपयांची चोरी झाली. कोल्ही येथे शफात अहमद पटेल व त्यांच्या जावयाच्या घरून रोख १ लाख व दागिने असा १.८३ लाखाचा ऐवज लंपास केला. ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी, दुष्काळी स्थिती यासारखी कारणे वाढत्या चोऱ्यांमागे असावे असे बोलले जाते. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित होत असून ते दहशतीखाली वावरत आहे. येथे कार्यरत ठाणेदार रणजीतसिंग चव्हाण यांना लाचलुचपत विभागाने १.२५ लाखांची लाच घेतांना पकडले होते. या कृतीमुळे पोलिसांवरील विश्वासनियता कमी झाल्याने नव्या ठाणेदारांपुढे मोठे आव्हान आहे.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासात समुद्रपूर पोलिसांना अपयश
By admin | Updated: July 6, 2017 01:26 IST