देवळी तहसिलीतील घटना : एनपीआरच्या कामाचा तिढा कायमवर्धा : लोकसंख्या अद्ययावतीकरणाच्या कामात सक्ती होत असल्याचा आरोप करीत अंगणवाडी सेविका त्याची माहिती देण्याकरिता शुक्रवारी तहसील कार्यालयात निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. यावेळी तहसीलदारांनी त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने सेविकांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला. हा प्रकार देवळी येथे घडला. शासनाच्यावतीने लोकसंख्या अद्ययावतीकरण करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर काम शिक्षकांकडून करण्यात यावे असे सांगण्यात आले होते. यामुळे शिक्षकांना या कामाकरता नियुक्त करण्यात आले. मात्र शिक्षकांनी ही नियुक्ती शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात आहे, असे म्हणत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही त्यांना या कामाकरिता यक्ती करू नये असे आदेश दिले. या कामातून शिक्षक बचावल्याने शासनाच्यावतीने सदर काम करण्याची सक्ती आता अंगणवाडी सेविकांना करणे सुरू केले आहे.अंगणवाडी सेविका या मानधनावर काम करणाऱ्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य सेवेची जबाबदारी आहे. शिवाय शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना आरोग्याव्यतिरिक्त इतर कामे देवू नये असे आदेश आहे. असे असताना जिल्ह्यात सेविकांवर सक्ती करण्यात येत आहे. या विरोधात गत आठवड्यात आयटकच्या माध्यमातून आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. असे असताना देवळी येथील तहसीलदारांनी पुन्हा या सेविकांना कामाचे आदेश दिले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी होणार असलेल्या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकत आपला विरोध नोंदविण्याकरिता तहसीलदारांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र या तहसीलदारांनी या अंगणवाडी सेविकांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.(प्रतिनिधी)पोलीस तक्रारीची तंबी अंगणवाडी सेविका त्यांचे निवेदन देण्याकरिता गेल्या असता येथील नायब तहसीलदाराने काम करण्यास नकार दिल्यास पोलीस तक्रार करू असा दम दिल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.निवदेन घेऊन अंगणवाडी सेविका नाही तर त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी आले होते. त्यांना मी अंगणवाही सेविकांना बोलवा असे म्हटले, मात्र त्या आल्या नाही. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची या कामावर नियुक्ती करण्यात येत आहे. - तेजस्विनी जाधव, तहसीलदार, देवळी
निवेदन न स्वीकारल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये रोष
By admin | Updated: November 7, 2015 02:04 IST