लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : विद्युतजोडणी न करताच शेतकऱ्याला जादा विद्युतदेयक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नजीकच्या बोपापूर येथे उघडकीस आला आहे. तब्बल २० हजार १८० रुपयांचे विद्युतदेयक देण्यात आल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. बोपापूर येथील शेतकरी मनोहर रामचंद्र झाडे यांची बोपापूर शिवारात सहा एकर शेती आहे. वर्षाला किमान तीन पिके घेता यावी, या हेतूने त्यांनी शेतात बोअरवेल खोदली. शिवाय कृषिपंपाच्या विद्युतजोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्ज सादर केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ११ जून २०२० ला त्यांना ६ हजार ८०७ रुपयांचा डिमांड दिला. पैशाची जुळवाजुळव करून हा डिमांड शेतकरी मनोहर झाडे यांनी भरला. परंतु, अद्यापही त्यांना त्यांच्या शेतातील कृषीपंपासाठी विद्युतजोडणी मिळालेली नाही. शिवाय महावितरणकडून साधे विद्युतमीटरही बसविण्यात आलेले नाही. मात्र, पाच महिन्यांनी नोव्हेंबर महिन्यात त्यांना थेट २० हजार १८० रुपयांचे अवाजवी विद्युतदेयक देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे.
वारंवार तक्रार; पण कार्यवाही शून्य
- शेतकरी मनोहर झाडे यांनी महावितरणच्या स्थानिक व हिंगणघाट येथील कार्यालयाला वारंवार तक्रारी देऊन वेळीच योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. परंतु, महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनीच लक्ष देत प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी आहे.
समस्या निकाली निघावी म्हणून आपण ५ फेब्रुवारी आणि त्यापूर्वी वेळोवेळी महावितरणच्या स्थानिक व हिंगणघाट येथील अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली आहे. पण अद्यापही समस्या कायम आहे. विद्युतदेयक भराच अशी दमदाटी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.- मनोहर झाडे, शेतकरी.