नगर पंचायत इमारतीची व्यथा : सात दिवसांतच ‘लोकमत’चे भाकित ठरले खरेकारंजा (घा.) : सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत करीत नगर पंचायतीच्या जीर्ण इमारतीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात ५१ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली होती. सात दिवसांतच हे भाकित खरे ठरले. बुधवारी सकाळी नगर पंचायत इमारतीच्या समोरील प्रवेशव्दाराचा स्लॅबचा अंदाजे १० चौरस फुट स्लॅबचा भाग कोसळला. दसरा व मोहरमची सुटी आल्याने नगर पंचायत कार्यालयात गर्दी तथा कर्मचारी नव्हते. यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. नगर पंचायतीची इमारत जीर्णावस्थेत असून स्लॅब कोसळण्याची भीती होती. इमारत ५१ वर्षे जुनी असून जागाही ठरते अपुरी असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते; पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर बुधवारी स्लॅब कोसळला. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षणी इमारतीचा कोणताही भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगर पंचायतीची इमारत जीर्ण झाली आहे. पाऊस आला की स्लॅबमधून पावसाच्या सरी इमारतीत येतात. वादळी वारा वा अती पावसाने इमारत कोसळणार तर नाही ना, अशी भीतीही निर्माण झाली आहे. पर्याय नसल्याने खुद्द मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक तथा कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन कामकाज करावे लागत आहे. अनेकदा डागडुजी करून उपयोग होत नसल्याचेच दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी स्लॅबला मोठ्या भेगा पडल्या आहे. जीर्ण झाल्याने स्लॅबला भगदाड पडले असून पोपडे जात आहेत. २५ ते ३० हजार लोकसंख्या आणि १७ प्रभाग असलेल्या या कारंजा नगराच्या तुलनेत नगर पंचायत इमारतीचे क्षेत्रफळ केवळ ५०० चौ.फुट आहे. यातील दुमजल्याचे कधी तळ मजल्यात रूपांतर होईल, हे सांगता येत नाही. इमारतीच्या तळमजल्यावर १९ नगरसेवक एका वेळी बसून चर्चा वा सभा घेण्यासही भीतात. दोन लोकही या स्लॅबवर उभे राहिले तर स्लॅब डोेलायला लागतो. बुधवारी स्लॅब कोसळल्याने इमारतीचाही भरवसा राहिलेला नाही.(शहर प्रतिनिधी)
अखेर प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळला
By admin | Updated: October 13, 2016 01:28 IST