सेलू : वाहितपूर ग्रा़पं़ च्या कर्मचाऱ्याला वर्षभरापासून वेतन मिळाले नाही़ यामुळे त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत आले़ याबाबत गुरूवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताना प्रशासनाला जाग आली; पण सदर कर्मचाऱ्याचे बारा महिन्यांचे वेतन शिल्लक असताना तीन महिन्यांचे वेतन देऊन बोळवण करण्यात आली़ उर्वरित वेतन एक-दोन दिवसांत दिले जाईल, असे सांगण्यात आले़तालुक्यात ८५० लोकवस्तीचे असलेले वाहितपूर ग्रा़पं़ विविध कारणांनी व तक्रारीने गाजत आहे. अशातच लाखो रुपयांचा निधी या ग्रा़पं़ कडे अखर्र्चित जमा आहे. निधी असतानाही येथील ग्रा़पं़ कर्मचारी एक वर्षापासून वेतनाविनाच कार्यरत होता. ग्रामसचिवाने २३ एप्रिल रोजी ५६ हजार १०० रुपयांचा धनादेश तयार केला; पण सरपंचाने त्यावर सही करण्यास नकार दिला़ यामुळे सदर कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली होती़ हक्काच्या वेतनाकरिता कर्मचारी गणेश डायगव्हाणे यांनी गटविकास अधिकारी ते मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन दिले; पण कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती़ याबाबत गुरूवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले़ वृत्त झळकताच गुरूवारी सकाळी ११ वाजता १४ हजार २५ रुपयांचा धनादेश सचिवांनी सदर कर्मचाऱ्यास प्रदान केला; पण उर्वरित नऊ महिन्यांच्या वेतनाचे काय, हा प्रश्नच आहे. कर्मचाऱ्याला संपूर्ण वेतन देण्याची मागणी आहे़(शहर प्रतिनिधी)
‘त्या’ कर्मचाऱ्याला मिळाले तीन महिन्यांचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:02 IST