आकोली : येथील अल्प भूधारक व पात्र लाभार्थ्याला मंजूर झालेली विहीर राजकीय हस्तक्षेपामुळे नाकारण्यात आली़ यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे़ अल्पभूधारक शेतकरी पुरूषोत्तम बालाजी गायकवाड हे गरजू असून पात्र आहेत़ आकोली ग्रा़पं़ च्या ग्रामसभेने त्यांना विशेष घटक योजनेत विहीर मिळावी म्हणून प्रस्ताव पारित करून पंचायत समितीकडे पाठविला. लाभार्थी पात्र असल्याने त्यांची विहीर मंजूर करण्यात आली व पंचायत समितीने निवड केलेल्या यादीत त्यांचे नावही आले. संबंधित विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी केली व १०० रुपयांचा स्टॅम्प पेपरही आणण्यास सांगितले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर लोकप्रतिनिधीला जाग आली व त्याला विहीर देऊ नका, असे फर्मान सोडले़ यावरून अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला विहीर देता येणार नाही, पूढील वर्षी देऊ, असे सांगण्यात आले़ शासकीय लाभापासून जाणीवपुर्वक डावलणे हा अनु़ जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी गुन्हा आहे. तेव्हा राजकीय हस्तक्षेप झुगारून मंजूर झालेली विहीर देण्यात यावी, तसे होत नसेल तर संबंधितांवर जातिवाचक गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित पुरूषोत्तम बालाजी गायकवाड यांनी जि़प़ मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)
पात्र लाभार्थी मंजूर विहिरीपासून वंचित
By admin | Updated: March 12, 2015 01:37 IST