कामाच्या दर्जावर प्रश्न : सुकळी मार्गावर अपघाताच्या घटनांत वाढ आकोली : सुकळी (बाई) ते माळेगाव (ठेका) पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी रस्त्याचे केलेले खडीकरण उखडले असून गिट्टी बाहेर पडली. यावरुन दुचाकी घसरून या मार्गावर अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. याकरिता रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. याकामात डांबराचा वापर नाममात्र करण्यात आल्याने अवघ्या आठ दिवसातच खडीकरण उखडले. गिट्टी उखडल्यामुळे येथून वाहन घेऊन जाणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. दुचाकी घसरून वाहन चालकांना दुखापत झाल्याच्या चार घटना मागील आठ दिवसात घडल्या. रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. विभागाच्या अभियंत्यांनी कामाची पाहणी करणे गरजेचे असते. येथे कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. नागरिकांनी विचारणा केली तर उलट उत्तर दिले जातात. माळेगाव (ठेका) रस्त्याचे काम अनेक टप्प्यात सुरू आहे. या प्रत्येक कामाकरिता वेगवेगळे कंत्राटदार नेमण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड येथील नागरिक करतात. येथील रस्ता बांधकामाचे तीनतेरा वाजत आहे. संबंधीत विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेत चौकशी करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
आठ दिवसांतच खडीकरण उखडले
By admin | Updated: January 18, 2017 00:54 IST