सेलू : तालुकास्थळ असलेल्या सेलू शहराचा विकास झपाट्याने होत आहे; पण शहराच्या विकास व सौदर्यींकरणात पार्किंगची समस्या मोठा अडथळा ठरत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे़ यामुळे शहरातील विकास कामांत मात्र अडथळा निर्माण होत आहे़ सेलू ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. बसस्थानक, मेडिकल चौक ते यशवंत चौक हा मुख्य मार्ग आहे. आठवडीबाजार व मटन मार्केट घोराडकडे जाणारा मार्ग अरुंद आहे़ या तीनही मार्गावर बाजारपेठ आहे. बसस्थानक ते यशवंत चौकापर्यंतच्या मार्गाचे रूंदीकरण व सौंदर्यीकरण ग्रामपंचायतीने केले खरे; पण या मार्गावरील दुकानांत येणाऱ्या ग्राहकांची वाहने अर्ध्या दूर रस्त्यात उभी असतात़ यामुळे या रस्त्याला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते. पादचारी व वाहनधारकांना मार्गक्रमण करताना यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे़ आठवडी बाजारात असणारी असुविधा ग्रामपंचायतीने दूर केली. दुकानदारांसाठी ओट्यांचे बांधकाम करण्यात आले़ रस्त्याचे सिमेंटीकरण केले; पण दिवसेंदिवस दुकानदार भाजी विक्रेत्याची संख्या वाढत असल्याने ग्राहकांना आपली वाहने ठेवण्यासाठी जागेचा शोध घ्यासवा लागतो़ ले-आऊट विकसित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ यामुळे गावाला शहराचे स्वरूप आले आहे़ कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मुख्य मार्गावर पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालये आहेत. शहराचा विकास आणि सौंदर्यीकरणासाठी ग्रा़पं़ प्रशासनाला सर्वप्रथम पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे़(शहर प्रतिनिधी)
शहराच्या विकासात पार्किंगचा खोडा
By admin | Updated: February 8, 2015 23:38 IST