अशोक कलोडे हिंगणघाटवणा नदीवरील स्मशानभूमी परिसरात सात अवैध वीटभट्ट्या सुरू आहे. विटा बनविण्यासाठी नदीच्या थड्या फोडून मातीचा वापर केल्या जात आहे. थड्या कोसळून नदीपात्राचा विस्तार सुरू असल्याने लगतच्या परिसराला पुराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.येथील स्मशानभूमी लगतच्या परिसरात सात वीटभट्ट्या असून नदी पात्रापलिकडेसुद्धा एक वीटभट्टी आहे. या वीटभट्ट्यांसाठी लागणारी माती नदीची थडी फोडून वापरली जात आहे. नदी काठावरील खोदकाम आता लगतच्या कब्रस्तानच्या भिंतीपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे या भिंतीला पुराचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्मशानभूमी समोरील नदी पलिकडच्या थडीची सुद्धा हीच अवस्था असून उंच थडी फोडून विटा बनविण्यासाठी मातीचा वापर होत असल्याचे दिसत आहे. याच ठिकाणी नदी पात्रात डिझेल इंजीन पंपाने पाण्याचा विना परवाना उपसा करून विटा बनविण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याने परिसर उजाड होत आहे. वीट भट्ट्यांच्या धुरामुळे विविध प्रजातीच्या पक्षांनी या ठिकाणी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत नदीथड्या व पात्र सुरक्षित राहावे तसेच नदीचे नैसर्गिक सौंदर्य टिकविण्यासाठी प्रशासनाने बेकायदेशीर वीट भट्ट्यांवर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
वीटभट्ट्यांमुळे वणा नदीच्या थड्या धोक्यात
By admin | Updated: January 22, 2015 01:47 IST