धनादेशाची प्रतीक्षा : सोनेगाव (बाई) येथील प्रशासनाचा प्रतापवायगाव( नि.) : इंदिरा आवास योजनेंतर्गत सोनेगाव (बाई) येथील प्रमोद देवराव वरठी या गरजू इसमास घरकूल मंजूर झाल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. म्हणून त्याला त्याचे राहते घर पाडण्यास सांगितले. चार दिवसात तुमच्या खात्यात बांधकामाकरिता रक्कम जमा होईल, असेही सांगितले. परंतु दोन महिन्यांपासून ही रक्कम जमा झालीच नाही. यामुळे घर पाडून बसलेल्या लाभार्थ्यास उघड्यावर राहावे लागत आहे. सोनेगाव (बाई) येथील रहिवासी प्रमोद वरठी याला १५ आॅगस्ट २०१५ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. दिवाळी अगोदर त्यांनी वरिष्ठांना करारनामाही सादर केला. वरिष्ठ अधिकारी व ग्रामसेविका यांनी प्रमोदला राहते घर पाडण्यास सांगितले. घर पाडल्यानंतर वरिष्ठांनी घराच्या रिकाम्या जागेवर ले-आऊटही पाडले. चार दिवसात पैसे खात्यात जमा होणार व कामाला सुरूवात करा असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र दोन महिने लोटूनही अद्याप वरठी यांना धनोदश मिळालेला नाही. राहते घर पाडल्याने संसार उघड्यावर आला. राहण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने चिमुकल्या दोन मुली व पत्नीला घेऊन कुठे जावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. रिकाम्या जागेवर टिनपत्रे लावून हे कुटुंब राहत आहे. त्यातच गारठा पडत असल्याने अधिकच हाल सोसावे लागत आहे. नियमाप्रमाणे लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर झाल्यावर करारनामा लिहून ले-आऊट पाडल्यानंतर ४ ते ५ दिवसात धनोदश लाभार्थ्यांच्या नावाने काढणे गरजेचे आहे. संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पीडित कुटूंब करीत आहे. ग्रामसेविका यांच्यासोबत संपर्क केला त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही.(वार्ताहर)
घरकुलाच्या नावावर घर पाडल्याने ‘त्या’ कुटुंबाचा संसार उघड्यावर
By admin | Updated: December 17, 2015 02:10 IST