वर्धा : देवळी बसस्थानकावर बस थांबत नाही, देवळीकरिता कुणी प्रवासी गाडीत बसले असतील तर त्यांनी गाडीखाली उतरावे, असा इशारा वाहकाने दिला़ यानंतरही दोन तरूण गाडीतच बसून राहिले. सावंगीलगत गाडी पोहोचल्यावर त्या तरूणांनी देवळीचे तिकीट मागितले. चालकाने देण्यास नकार दिल्यानंतर हुज्जत घातली. प्रशाशांनीही तरुणांना समजाविले; पण ते अरेरावीवर उतरल्याने तणाव वाढला़ यामुळे प्रवाशांना घेऊन बस थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. नागपूर येथून लातूरकरिता एम. एच. २०/२७८५ ही बस शनिवारी सकाळी निघाली. दुपारी २ वाजता वर्धा बसस्थानकात पोहोचली. एसटी प्रवासी घेऊन २.१५ वाजता बसस्थानकातून रवाना झाली. यावेळी वाहकाने देवळीला गाडी थांबणार नाही, अशी सूचना केली. यामुळे देवळीचे प्रवासी गाडीखाली उतरले. वाहकाने तिकीट फाडण्यास प्रारंभ केला तेव्हा गाडी सावंगी गावालगत पोहोचली होती. तेथे देवळीचा रहिवासी असलेल्या कारोटकर नामक तरूणाने वाहकाला देवळीची दोन तिकिटे मागितली. वाहकाने देण्यास नकार दिला. दोन्ही तरुणांनी वाहकासोबत वाद घातला़ यामुळे तेथेच गाडी थांबविण्यात आली़ तेव्हा गाडीत ४० महिला, पुरुष व बालके होते. वाहक व प्रवासी यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये चालकाने हस्तक्षेप केला; पण दोन्ही तरुण ऐकण्यास तयार नव्हते. यामुळे अन्य प्रवाशांनी बाचाबाची करणाऱ्या तरूणाला विनंती करून गाडीखाली उतरण्यास सांगितले; पण ते जुमानले नाही. शेवटी ३ वाजता चालकाने सावंगी येथील बायपासवरून बस वर्धेकडे वळविली आणि एसटी थेट प्रवाशांसह शहर ठाण्यात पोहोचली. पोलीस ठाण्यात आल्यावर वाहकाशी बाचाबाची करणाऱ्या दोन्ही तरूणांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वाहक सुरेश गारगोटे व चालक सोपान कांबळे यांनी कारोटकर नामक तरूणाविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले व महिला पोलीस अधिकारी रामटेके यांनी तक्रार घेतली. तोपर्यंत प्रवासी उभ्या बसमध्ये पोलीस कारवाई संपण्याची प्रतीक्षा करीत होते. पाणी, भुकेने व्याकुळ बालके रडत होती़ दोन्ही तरूणांविरूद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला़(स्थानिक प्रतिनिधी)
तरुणांच्या वादामुळे बस पोलीस ठाण्यात
By admin | Updated: March 2, 2015 00:18 IST