आकोली : कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ता कामावर खर्च होत असला तरी रस्त्याची दुरवस्था संपत नसल्याचेच दिसते़ दररोज होणारे अपघात कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे; पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित विभागाला जाग येताना दिसत नाही़ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी सामान्यांतून करण्यात येत आहे़वर्धा ते आर्वी हा जिल्हा मार्ग मरणवाट ठरत आहे़ या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका अपघाताची प्रतीक्षा करताना दिसते़ सुकळी (बाई) टी-पाँईट जवळील खड्ड्याने तर अनेकांना दवाखान्याचा रस्ता दाखविला़ पिपरी गावाजवळील खड्ड्याला खड्डा म्हणावे की महाखड्डा, हेच वाहनचालकांना कळत नाही. वारेमाप पैशांची उधळण करूनही रस्त्याचे हाल जैसे थे आहे. शासनाच्या निधीतून अधिकारी मालामाल झालेत, कत्राटदार कुबेर बनलेत, शासनाची तिजोरी रिकामी झाली; पण रस्ते सुस्थितीत आले नाहीत़ वाहन चालविताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या कुरण ठरले आहे़ संबंधित विभागाचे अधिकारी वातानुकूलित कक्षातून बाहेर पडायला तयार नसल्याचेच दिसते़जिल्हा मार्गाची अत्यंत दुरवस्था असून ग्रामीण भागातील रस्तेही मरणाला स्वस्त झाले आहेत़ पाय ठेवाल तेथे खड्डा दिसतो़ डांबर-गिट्टी नावालाही शिल्लक नसलेले रस्ते पाहायचे असेल तर अधिकाऱ्यांनी आकोली ते आंजी (मोठी) रस्त्यावरून फेरफटका मारला पाहिजे़ मुख्य मार्ग असलेल्या आर्वी ते वर्धा दरम्यान खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ या मार्गाने वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे़ रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़ सार्वजनिक बांधकाम विभागाने या जिल्हा मार्गाच्या दुरूस्तीचा मुहूर्त काढून ग्रामस्थांना उपकृत करावे, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)
खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूकदारांचा जीव धोक्यात
By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST