वर्धा : शेतात राबराब राबत असलेल्या बैलांच्या कर्जातून उतराई होण्याचा सण म्हणजे पोळा. अवघ्या चार ते पाच दिवसांवर तो येऊन ठेपला आहे. पण गत वर्षी ओला आणि या वर्षी कोरडा दुष्काळ पसरल्याने सणातील उत्साहावर विरजण पडले आहे. त्यामुळे पोळा सणावरच अनुत्साही वातावरण असून दुष्काळाची गडद छाया पहावयास मिळत आहे.पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. बँका, सावकारांकडून कर्ज, उसनेपासने करत बी-बियाणे खरेदी करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाकलेली पिके पाहण्याची वेळ आली आहे. पोळा सण साजरा करण्यासाठी उसणे अवसान बळीराजा आणत आहे. मात्र दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी महागाई वाढल्याने या सर्जा-राजाला कसे सजवावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.गतवर्षी जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. तर यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी शेतकऱ्यांची बैलांवरील निष्ठा कमी झालेली नाही. त्यामुळे पोळा हा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. पण दुष्काळाचे सावट पसरल्याने चार दिवसावर सन आलेला असतानाही ग्राहकांअभावी बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पोळ्याला बैलाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने सजली आहेत. घुंगरू, रेशीम, घाटी, रंगीत झुल्या, मोरकी, वेसन, बाशिंग, गोंदे, कवडी यासह इतर साहित्यांनी दुकाने सजली आहेत, परंतु हे साहित्य खरेदीसाठी वर्दळ नसल्याने व्यापाऱ्यांत औदासिन्य पसरले आहे. त्यातच साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्यांचे दिसून येत आहे. बैलाच्या शिंगांना लावण्यात येणारे रंग, बेगड यांच्याही दरामध्ये गतवर्षीपेक्षा १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात घुंगरू ४०० रुपये, चंगाळ १०० ते १२० रुपये, रेशीम ११० ते १२०, मणिमाळ २० ते २५ रुपये, कासरा १०० ते १२०, कवडीमाळ १३० ते १५०, बाशिंग ६० ते ८०, गोंडे ११० ते १२५, मोरकी ४० ते ५० रुपये व झुलीचे भाव ९०० ते १५०० रुपये असा टप्पा गाठल्याने पोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव दुष्काळी परिस्थितीत वाढल्याने यावर्षी पोळा सणातील शेतकऱ्यांचा उत्साह कमी दिसून येत आहे. बाशिंगाला मोठे महत्त्व असते पण त्याच्याही किमतीत वाढ झाल्याने काय खरेदी करावे, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. तीन ते चार वर्षापासून विविध मार्गांनी नैसर्गिक संकट येऊन शेतकरी देशोधडीला लागला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. वस्तूंचे वाढलेले दर लक्षात घेता यावर्षीचा पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा होणार आहे. आजही शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पण दोन चार शिरवे सोडले तर चांगला पाऊस यायला तयार नाही. संपूर्ण विदर्भात हे चित्र पाहावयास मिळत आहे. आपले वडील चिंतेत असल्याचे लहान मुलांलाही जाणवत आहे. बैलांनाही हे नक्कीच जानवत असणारच.(शहर प्रतिनिधी)
पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: August 20, 2014 23:42 IST