वर्धा : जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा येऊनही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना वेतन मिळाले नाही. याबाबत काही शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेत याबाबत विचारणा केली असता हा घोळ शालार्थ वेतन प्रणालीतील अनियमिततेमुळे झाल्याचे समोर आले आहे. शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांचे वेतन करण्याची कार्यवाही करताना जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागात समन्वय नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पहिल्या तारखेला करण्याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश काढले; मात्र याकडे विभागाच्यावतीने दुर्लक्ष होत असल्याचे शिक्षकांचे वेतन विलंबाने होणे आता नित्याचे झाले आहे. शालार्थ प्रणालीनुसार मुख्याध्यापकाला वेतन देयके तयार करून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आॅनलाईन पाठविण्याकरिता प्रमाणक क्रमांक विलंबाने मिळतो आणि यातून पुन्हा पुढील महिन्याच्या वेतनास अधिक विलंब होत जातो. मुख्याध्यापकाकडून गटशिक्षणाधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात, तेथून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात, नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, त्यानंतर कोषागार कार्यालय आणि पुन्हा याच क्रमाने परत गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती लेखा विभाग असा वेतन प्रक्रियेचा प्रदीर्घ प्रवास आहे. त्यातही एखाद्या शुल्लक कारणामुळे त्रुटी निघाल्यास किंवा जाणीवपूर्वक काढल्यास हा प्रवास अधिकाधिक वाढत जातो.(प्रतिनिधी)
जि. प. शिक्षकांना डिसेंबरच्या वेतनाची प्रतीक्षा
By admin | Updated: January 20, 2015 22:39 IST