राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान : प्रत्येकाचे काम समजून घेत केले मार्गदर्शन वर्धा : ग्रामीण भागातील द्रारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे. जिल्हास्तरावर अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. अभियानाच्या माध्यमातून गावस्तरावर विविध गटांची बांधणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील वडगाव (जंगली) येथे उमेद अभियानाचे काम सुरू असून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी उमेद अभियानाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. जिल्हा स्तरावरून होणाऱ्या कामाची पाहणी व कार्यरत विविध समुदाय संसाधन व्यक्ती यांचे कार्य सीईओंनी जाणून घेतले. यावेळी जि.प. महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प.सदस्य वीणा वाळके, पं. स. सदस्य अर्चना मुडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक मनीष कावडे, प्रफुल इटाल, सोनाली भोकरे उपस्थित होते. जिल्ह्यात देवळी, सेलू, वर्धा तालुक्यांमध्ये एकूण ५ हजार ६९३ गट, ३३६ ग्रामसेवा संघ तर १७ प्रभाग संघ तयार करण्यात आले आहे. उमेद अंतर्गत गटांना सेवा देण्याकरिता गावातीलच समुदाय संसाधन व्यक्ती निवडण्यात आली असून त्याच्याद्वारे गावात गट व गाव विकासाचे काम सुरू आहे. याचीच पाहणी करण्याकरिता नयना गुंडे यांनी संध्या ग्रामसेवा संघ वडगाव(जंगली) येथे भेट देऊन अभियानाचे काम समजून घेतले. यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती, प्रेरिका, लेखापाल, पशुसखी, कृषीसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, वर्धिनी यांची कार्यप्रणाली समजून घेतली. तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, शिल्पा मोरे, प्रभाग समन्वयक सुप्रिया कांबळे, ग्राम सचिव डोंगरे, नंदा करनाके, माधुरी श्रीराम, कलावती करनाके आदींनी सहकार्य केले. आभार आशा पेंदाम यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)
जि. प. सीईओंनी घेतला ‘उमेद’ अभियानाचा आढावा
By admin | Updated: August 1, 2016 00:33 IST