जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : १३ व्या वित्त आयोगातील कामेदेवळी : शहर विकासाच्या कामांना कुठेही आडकाठी न घालता जास्तीत जास्त चालना देण्याला प्रशासनाचा अग्रक्रम राहील. न.प. चे कोणतेही प्रस्ताव थकीत राहणार नाही. सुंदर व सुनियोजीत शहराची अपेक्षा पुर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, असे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. स्थानिक न.प. वास्तूच्या ७५ लाखाच्या खर्चातून सजावटीची कामे करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते तर अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, नगराध्यक्ष शोभा तडस यांची उपस्थिती होती. शासन व प्रशासन यांच्यातील एकवाक्यतेमुळेच कोणतेही काम यशस्वी होते. याच धोरणाने कमी लोकसंख्येचे शहर असलेल्या देवळीचा विकास प्रगतीपथावर आहे, असे विचार जिल्हा पोलीस अधीक्षक गोयल यांनी यावेळी व्यक्त केले. १४७ वर्षाची परंपरा लाभलेल्या देवळी न.प.चा मॉडेल सिटी बनविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. यासाठी आठवडी बाजार चौकात साडेपाच कोटीचे अद्ययावत नाट्यगृह, १३ व्या वित्त आयोगातून न.प. हायस्कूलचे प्रांगणात सव्वाकोटीचा ई सायब्रर प्रोजेक्ट, न.प. कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची परवानगी तसेच सव्वाकोटीच्या खर्चातून शाळेचे बांधकाम हाती घेण्यात आले असून याव्यतिरिक्त शॉपींग सेंटर, ओट्यांचे बांधकाम, प्रशस्त रस्ते, सौंदर्यीकरणाचे कामांना चालना दिली जात आहे, अशी माहिती खासदार तडस यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष शोभा तडस यांनी अतिथींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी केले. गटनेते विलास जोशी, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने यांनी विचार व्यक्त केले. संचालन व आभार नगरसेवक राहुल चोपडा यांनी केले. यावेळी न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, माजी नगराध्यक्ष दिलीप कारोटकर, अब्दुल नईम, माला लाडेकर, ज्योती इंगोले, सुचीता मडावी, सारिका लाकडे अर्चना वानखेडे, न.प. कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सुंदर व सुनियोजित शहरासाठी जिल्हा प्रशासन पाठीशी
By admin | Updated: August 6, 2015 00:31 IST