वर्धा : तरूण वर्ग शिक्षित झाला, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीमुळे युवकांचा मानसिक तोल ढासळत आहे. यातूनच व्यसन जडते. स्व्यसनापासून समाजाला वाचवायचे असेल तर ग्रामगितचे अध्ययन गाव पातळीपासून व्हायला हवे, ग्रामगितेत समता, बंधुत्व, सलोखा नांदविण्याचे प्रमाण आहे, असे मत मार्गदर्शक अजय डोंगरे यांनी केले.समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर येथे डॉ. सुभाषदादा विदर्भ ग्रामीण संस्था आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बालगोपाल पुरूष बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट यांचा सहभाग होता. यानंतर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच शुभांगी घुगस होत्या. उद्घाटक हिरा खडसे, प्रमुख पाहुणे प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदोरीचे डॉ. सुने, पोलीस निरीक्षक समुद्रपूर जिट्टेवार, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक धनराज घोडे, दिनेश खडसे आदी मान्यवर होते. यानंतर सामुहिक ग्रामगिता अध्यायाचे वाचन करण्यात आले. युवकांनी व्यसन करू नये म्हणून सामूहिक संकल्प केला. कार्यक्रमाला बचत गटातील जयश्री दाते, करिश्मा दाते, रंजना सोंगे, मंगला खडसे, राजू खंडार, राजेंद्र दाते, संगिता खंडार, कमला जोगे, सुनिता दाते, अनुसया घुगसे, सुमन मेंढे, जिजा खडतकर, नलिनी मुंजेवार, रवीना पाटील, ज्योत्स्ना गाताडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
ग्रामगीता अध्ययनातून व्यसनमुक्ती शक्य
By admin | Updated: January 17, 2015 23:04 IST