वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सालोड (हिरापूर) येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्राच्या संस्कृत संहिता सिद्धांत विभागाद्वारे दर्शनशास्त्राची भूमिका प्रासंगिकता, त्याचा आयुर्वेदावर प्रभाव व चिकित्सकीय उपयोगिता’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला जिज्ञासूंनी उपस्थिती लावली. चर्चासत्राचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. श्याम भूतडा यांनी केले. याप्रसंगी समन्वयक व्ही.के. मेघे, विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रीती देसाई, डॉ. के.एस.आर. प्रसाद, पुणे येथील ख्यातनाम वैद्य मोहन जोशी, नागपूरचे श्रीराम ज्योतिषी, आयुर्वेदाचार्य बाबा मसकनाथ, हरियाणा येथील रोहतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लीना नानोटी, डॉ. भारत चौरागडे आदी उपस्थित होते. प्रथम सत्रात डॉ. लीना नानोटी यांनी संहितावाचन काळाची गरज विषयावर तर डॉ. मोहन जोशी यांनी दर्शनशास्त्राची आयुर्वेदीय चिकित्सेत उपयोगिता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. चौरागडे यांनी आयुर्वेदातील मुलभूत सिद्धांतांवर प्रकाश टाकला. यावेळी आयोजित संहिता आधारीत आयुर्वेदीय शिक्षण या विषयावरील निबंध स्पर्धेत वसुधा उमाटे, तुषार वाघमारे व अमृता भांबुरकर तर समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत वसुधा उमाटे, नितीन आंबटकर, अमृता भांबुरकर हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. विजेत्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोपापूर्वी प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची तज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन केले. चर्चासत्राकरिता संयोजक डॉ. सरोज तिरपुडे, संयोजन सचिव डॉ. अनिल आव्हाड तसेच संस्कृत संहिता सिद्धांत विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
‘दर्शनशास्त्राची भूमिका, प्रासंगिकता व आयुर्वेदावर प्रभाव’वर चर्चासत्र
By admin | Updated: July 13, 2016 02:52 IST