जीव मुठीत घेऊन प्रवास : लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आंजी (मोठी) : येथून चार किमी अंतरावर असलेल्या धुळवा गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला येथे शाळा, दवाखाना, बँक, दुध संकलन केंद्र, सहकारी संस्था, बाजार, व्यवसायाकरिता वा अन्य लहान-सहान कामांसाठी यावे लागते. हे नागरिक सायकल, दुचाकी वा पायी प्रवास करतात; पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना आंजी गाठताना यातना सहन कराव्या लागतात. खड्डेमय रस्त्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. धुळवा गावाची लोकसंख्या २५० च्या आसपास आहे. ग्रामपंचायत आंजी असून एक सदस्य गावाचे प्रतिनिधीत्व करतो. चौथीपर्यंत जि.प. शाळा असून गावातील लोकांचा व्यवसाय शेती व शेतमजुरी आहे. येथील नागरिकांना कुठल्याही कामासाठी आंजीला यावे लागते; पण रत्याच्या दुरवस्थेमुळे प्रत्येकाला येताना विचारच करावा लागतो. २० वर्षांपूर्वी बोरगाव रोडवरून जाणारा जोडरस्ता गावाला मिळाला होता. तो आज पूर्णत: हरवला आहे. येथे डांबरी रस्ता होता, याचे केवळ अवशेष पाहावयास मिळतात. ग्रामस्थांनी अनेकदा रस्ता निर्मितीची मागणी केली; पण त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसते. निवडणुकांमध्ये २५० मतांना अधिक महत्त्व दिले जात नाही. यामुळेच कधी उमेदवारही प्रचारालाही येत नाही. केवळ कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी मते मागायला येतात. गतवर्षी खा. रामदास तडस यांना घेऊन सरपंच आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली होती. यावर त्यांनी आश्वासन दिले होते; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. दुचाकी वा सायकलने येताना जीव मुठीत घेऊन यावे लागते. सायंकाळी गावातून आंजीकडे येण्याची कुणी हिंमत करीत नाही. खड्डेमय रस्ता टाळून ग्रामस्थ नदीतून आंजी येथे येतात. यामुळे अपघाताचा धोका आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत आंजी (मोठी) ते धुळवा रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.(वार्ताहर) ४आंजी (मोठी) ते धुळवा रस्त्याची २० वर्षांपूर्वी निर्मिती झाली होती. तेव्हापासून साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. परिणामी, आज डांबरी रस्ता होता, याचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहे. यामुळे सदर रस्त्याची दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आंजी-धुळवा रस्त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून मागणी केली होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत रस्ता मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होईल. त्याची प्रक्रिया सुरू आहे. - जगदीश संचेरीया, सरपंच, ग्रा.पं., आंजी (मोठी).
धुळवा रस्ता झाला खड्डेमय
By admin | Updated: October 10, 2016 01:24 IST