विकास ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:18 AM2019-08-02T00:18:20+5:302019-08-02T00:18:53+5:30
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात वर्ध्यात सिमेंटीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला आहे. शहरातील डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. काही कामे प्रगतिपथावर आहे; मात्र नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे कंत्राटदाराचे मनमर्जी काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात वर्ध्यात सिमेंटीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला आहे. शहरातील डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. काही कामे प्रगतिपथावर आहे; मात्र नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे कंत्राटदाराचे मनमर्जी काम सुरू आहे. परिणामी, हा विकास वर्धेकरांसाठी जीवघेणा ठरत आहे.
शहरातील धुनिवाले मठ ते धंतोली चौकापर्यंतचा बॅचलर रोड, आर्वी नाका ते जुनापाणी चौक तसेच महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गांचे सिमेेंटीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. आर्वी नाका ते शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौक ते झाशी राणी चौकापर्यंतच्या मार्गाचे सिमेेंटीकरण सुरू आहे. ज्या मार्गाचे काम पूर्णत्वास गेले, त्या मार्गांची उंची चांगलीच वाढल्याने लगतच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच ज्या मार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही, त्या मार्गावरील काम अगदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित होत असून वर्धेकरांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदारांची नियोजनशून्यता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांच्या बांधकामाच्या कालावधीत अनेक किरकोळ व मोठे अपघात झाल्याने काहींना अपंगत्वही आले आहे.
भूमिगत योजनेने वाढविली डोकेदुखी
केंद्र शासनाद्वारे वर्ध्यात अमृत योजना राबविण्यात येत आहे. शंभर कोटी रुपयांवर निधी खर्च करून जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम करीत असताना कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला काही दिवसांपूर्वीच पालिकेकडून लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक फोडून जलवाहिनी टाकली. तसेच काही ठिकाणी रस्त्यांचेही खोदकाम करण्यात आले. जवळपास दीड ते दोन वर्षांपासून हे काम सुरू असून अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांच्या घरासमोरील खड्डे कायमच आहेत.
भूमिगत गटार योजनेच्या कामात काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्चून बांधलेले सिमेंटचे रस्ते अल्पावधीतच मधोमध खोदण्यात आले. त्यामुळे या रस्त्यांवर केलेला खर्च निरर्थकच ठरला. विशेषत: मधोमध खोदलेले बहुतांश रस्ते अद्यापही पूर्ण बुजविलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील अंतर्गत रस्तांवरही चिखल साचलेला दिसून येतो. त्यामुळे सिमेंट व डांबरी रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आलेले दिसते.
गटार योजनेच्या कामाकरिता जागोजागी गटार तयार करण्यात आले. पण, काम करीत असताना कंत्राटदाराने सूचना फलक न लावल्यामुळे बहुतांश ठिकाणी या गटाराच्या खड्डयात वाहनासह नागरिकही साठवले आहे. इतकेच नाही तर गांधीनरातील एका खड्डयात शाळेकरी मुलगा आदित्य बैस याला आपला जीवही गमवावा लागला. तरीही काहीही सुधारणा होताना दिसून येत नाही. अद्यापही बऱ्याच ठिकाणी सूचना फलकाशिवायच काम केली जात आहेत.
रस्ता झाला; पण, दुभाजकाचा पत्ता नाही!
आर्वी नाका ते जुनापाणी चौक हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. या मार्गावरील सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पण, अद्यापही या मार्गावर दुभाजक बसविण्यात आले नसल्याने वाहनचालक कोठूनही वाहने पळविता. दुभाजकाअभावी मार्गावरील वाहतूक सुसाट झाली असून याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, येथे दररोज अपघात पाहावयास मिळत आहेत.
अतिक्रमणाचेही ‘येरे माझ्या मागल्या’
सिमेंटीकरण आणि रुंदीकरणाकरिता आर्वी नाका ते जुनापाणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते गांधी चौक आणि बॅचलर रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याही रुंद दिसत होता. परंतु, आता बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. आर्वी नाका ते जुनापाणी चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून नालीवरच दुकानदारी थाटण्यात आली आहे. त्यामुळे समस्या कायम आहेत.