गोंदिया : तिरोडाच्या संत रवीदास नगरात सुरू असलेल्या दारूभट्ट्यांवर धाड घालून चार दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. या कारवाईत राजेंद्र भोंडेकर (३८) याच्याकडून ३ लिटर हातभट्टीची दारू, १२ किलो मोहफूल व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३ हजार २३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई याच परिसरातील एका महिलेकडे करण्यात आली. शिला विनोद खरोले (२८) या महिलेकडे १५ बोरी मोहफूल, दोन लिटर हातभट्टीची दारू होती. ती दारू व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शिला खरोलेकडून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १३ हजार ११० आहे. तिसरी कारवाई संतोष रमेश बरियेकर (३८) याच्या घरी करण्यात आली. त्याच्या घरुन १८ लिटर हातभट्टीची दारू व ३ पोती मोहफूल, दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण चार हजार ३२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. चौथी कारवाई याच परिसरातील सुरज प्रकाश बरियेकर (२६) याच्याकडे करण्यात आली. त्यांच्याकडून २० लिटर मोहफुलाची दारू, १२ पोती मोहफूल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात ११ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर तिरोडा पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ब) क,ड,ई,फ अन्वये गुन्हा दाखल करून ३२ हजार ५६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक कुंभार व इतर कर्मचाऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
तिरोडा परिसरात चार दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Updated: November 1, 2014 01:51 IST