बोरधरण येथील विनयभंग प्रकरण : पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने दिला निर्णयवर्धा : एका आदिवासी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सेलू ठाण्याच्या उपनिरक्षकाची वर्धा न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. राजू चौधरी १ आॅगस्टपर्यंत कारागृहात राहणार असून हा निर्णय शनिवारी देण्यात आला. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुन्हा दाखल करतेवेळी पोलीस ठाण्यातून पसार असलेल्या राजू चौधरीला पकडण्याकरिता पोलीस गेले असता पळण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला होता. त्याच्यावर अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वर्धा पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री वर्धेत आणत शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. त्याला १ आॅगस्टला न्यायालयात हजर करण्यात येणार असून यानंतर पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात येणार आहे.या प्रकरणातील तिसरा आरोपी अटकपूर्व जामीन घेऊन आल्याने न्यायालयाने त्याच्या अर्जावरही आज सुनावणी न करता पुढील तारीख दिली. त्याच्या जामीन अर्जावर येत्या गुरुवारी (दि. २२ जुलै) सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी राजू चौधरी याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याने त्याला गुन्हा दाखल असलेल्या सेलू पोलीस ठाण्याच्या कोठडीत पाठविण्यात आले. वर्धेतील कार्यवाही पूर्ण करून त्याला रात्री ९ वाजताच्या सुमारास सेलूत आणण्यात आले. गुन्हा दाखल करण्याच्यावेळी याच ठाण्याच्या आवारातून तो पसार झाला होता. पोलिसांची इभ्रत घालविणाऱ्या राजू चाधरीला पोलीस कोठडीत आणल्याची माहिती गावात पसरताच जो तो त्याला पाहण्याकरिता पोलीस ठाण्याकडे धाव घेत होता. शिवाय त्याला साहेब म्हणून मान देणारे पोलीस कर्मचारीही त्याच्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होते. (प्रतिनिधी)
‘त्या’ उपनिरीक्षकाची कारागृहात रवानगी
By admin | Updated: July 19, 2015 02:17 IST