ज्येष्ठ नागरिकांना वाहकाने नाकारली होती सवलत : तक्रारीवरून ग्राहक मंचने दिली विभागीय कार्यालयात धडकहिंगणघाट : येथील एक नागरिक हिंगणघाट परिवहन महामंडळाच्या बसने नागपूरला जात होते. यावेळी जाताना त्यांना वाहकाने वाहन चालविण्याच्या परवान्यावरून ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलत दिली. मात्र परतीच्या प्रवासात त्यांना दुसऱ्या वाहकाने त्याच वाहन परवान्यावर सवलत नाकारली. त्यांनी याची तक्रार परिवहन विभागाकडे केली असता विभागीय नियंत्रकांनी वाहक नवीन असल्याचे म्हणत ग्राहक पंचायतीसमोर दिलगिरी व्यक्त करून पैसे परत केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण डहाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील विजय गोविंद बाकरे (६६) हे १४ जानेवारी २०१६ रोजी नागपूरला राज्य परिवहन विभागाच्या बसने प्रवास करीत होते. त्यांनी प्रवासात वाहकास आपल्या जवळील वाहन चालविण्याचा परवाना दाखविला असता त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून तिकिट सवलत दिली. त्याच रात्री ते नागपूर-हिंगणघाट बसमध्ये प्रवास करीत असताना वाहकाने वाहन चालविण्याच्या परववान्यावर सवलत नाकारून पूर्ण तिकिट घेण्याकरिता बाध्य केले. बाकरे यांनी झालेल्या घटनेबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडे १५ जानेवारी २०१६ रोजी धाव घेत दुर्व्यवहाराबाबत तक्रार दिली. ग्राहक पंचायतीने सदर तक्रार तक्रारकर्त्यासह परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूपूर्द करून ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीबद्दलच्या प्रतीची मागणी केली. त्यावर अधिकाऱ्याने आपली अनभिज्ञता दर्शविली. सदर प्रकरण ग्राहक पंचायतच्या शाखा अध्यक्षाने उचलून धरले. त्यांनी विभागीय परिवहन महामंडळ यांच्याकडे १६ जानेवारी २०१६ रोजी रितसर तक्रार नोंदविली. त्यावर विभागीय नियंत्रकानी प्रकरणाची वेळीच दखल घेवून १२ फेब्रुवारी २०१६ अन्वये वाहक हा नवीन असल्याने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शिवाय सर्व आगार व्यवस्थापकांकडे परिपत्रकाची प्रत पाठवून ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही कर्मचाऱ्याने सवलती देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा त्रास दिल्यास संबंधितावर कठोर कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तक्रार कर्त्यास ४५ रुपये परत करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
विभागीय नियंत्रकांनी व्यक्त केली दिलगिरी
By admin | Updated: February 27, 2016 02:33 IST