अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शहीदभूमी तालुक्याची निर्मिती होण्याच्या दोन वर्षापूर्वी सप्टेंबर १९८० मध्ये तळेगाव-आष्टी- साहूर या मार्गाला राज्यमार्ग २४४ म्हणून शासनाने मंजुरी दिली. तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. यासोबतच या मार्गाच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरणाच्याही कामाला गती देण्यात आली. दीडशे कोटी रुपये खर्र्चुन बाधण्यात येत असलेल्या या रस्त्याच्या बांधकाम मातीमिश्रीत भुकटीचा वापर करण्यासोबतच अनेक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.या राष्टीय महामार्गाचा कंत्राट आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील आर. आर. कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाला आहे. या ४० किलो मीटरच्या कामाकरिता १५० कोटी रुपये मंजूर झाले आहे. आॅक्टोबर २०१८ पासून कामाला सुरुवात करुन प्रारंभी रस्त्याच्या दुतर्फा असलेली डौलदार वृक्ष अत्यल्प भावा आडवी केली. त्यानंतर मातीकामाला सुरुवात करुन याच रस्त्याच्या तळभागातील माती काढून ती मुळ रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली. हार्ड मुरुम टाकण्याऐवजी सॉफ्ट मुरुम टाकण्यात आला. त्यातही मुरुम अस्तरीकरणाची जाडीही खूपच कमी आहे. काम करताना कंत्राटदाराने जीएसबीचे ग्रेड १, ग्रेड २ न करता गिट्टी आथरून त्यावर भुकटी टाकण्यात आली. या मार्गावरील जुने सर्व पूल नामशेष करुन नवीन पुलाचे बांधकाम करताना सिमेंट काँक्रिटमध्ये नाममात्र वाळूचा वापर करण्यात आला. रस्त्यावर मुरुमाची दगडी भुकटी तयार करुन सर्रास वापर केल्या जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना या कामांवर पाणी मारण्याची गरज असताना पाण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. उभारण्यात आलेल्या प्लान्टवरही रेतीचा पत्ता नाही तसेच सिमेंटही वेगळ्याच प्रकारचे दिसून येत असल्याने या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कामाची गुणवत्ता कायम राखण्याच्या अटीवर शासनाकडून कोट्यवधीचा कंत्राट देण्यात आला. पण, कंत्राटदाराने मनमर्जी कारभार चालवून रस्त्याची वाट लावण्याचा विडा उचलल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. या रस्त्यावरील मुरुमाची गरज पुर्ण करण्यासाठी महामार्गावरील खदानी सोडून आष्टी-परसोडा रस्त्यावरील डोंगरगाव खदान पोखरुन टाकली आहे. त्यातही १ ब्रासच्या रॉयल्टीवर ५ ब्रासचा डंपर ओव्हरलोड करुन नेतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. शिवाय शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. या रस्त्यावर अनेक अपघातही होत आहे. त्यामुळे या सर्व कामाची चौकशी करून कंत्राटदाराला दर्जेदार काम करण्याची ताकीद द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू भार्गव व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कामाकडे फिरकतच नाहीराष्ट्रीय महामार्गाचे काम नियमानुसार केले जात असून काम करताना दर्जा सांभाळला जात आहे. बांधकामात वाळू व दगडाची भुकटी वापरल्या जाते, असे आर.आर. कंपनीचे विभागीय अधिकारी राजेंद्र अढाऊ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विशेषत: या कामाकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून फिरकलेच नसल्याने कंत्राटदाराला मनमर्जीने काम करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. या सदोष बांधकामामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.तळेगाव-आष्टी-साहूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम फारच निकृष्ट सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याची वाट लावली जात आहे. कंस्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी मुजोर आहे. त्यांनी नागरिकांच्या जीवनाशी खेळ मांडला आहे. याप्रकरणी वेळीच दखल घेतली नाही तर उपोषणही केले जाईल.सोनू भार्गव, तालुकाध्यक्ष, रायुकाँ, आष्टी (शहीद)धाडी गावाजवळ पाच-सहा मोठमोठे पूल बांधले. मात्र, निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामावर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे भविष्यात हे काम धोकादायक ठरणार आहे. तक्रार केल्यावर कंपनीचे अधिकारी अरेरावी करतात.विजय मानकर, शेतकरी.
महामार्गाच्या सिमेंटीकरणावर सदोषतेचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:55 IST
शहीदभूमी तालुक्याची निर्मिती होण्याच्या दोन वर्षापूर्वी सप्टेंबर १९८० मध्ये तळेगाव-आष्टी- साहूर या मार्गाला राज्यमार्ग २४४ म्हणून शासनाने मंजुरी दिली. तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. यासोबतच या मार्गाच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरणाच्याही कामाला गती देण्यात आली.
महामार्गाच्या सिमेंटीकरणावर सदोषतेचा ठपका
ठळक मुद्देतीन तपानंतर उजाडले भाग्य : बांधकामात मातीमिश्रित भुकटीचा वापर; नागरिकांमध्ये रोष