किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे वर्धा : जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ३ टक्के व्याजदराने पैसे देवून अवैध सावकारांनी हडप करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सावकारीत व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात संबंधीत शेतकऱ्यांची शेतजमीन सावकाराने आपले नावे रजिस्टर विक्री करून घेतली. विक्री जरी करून घेतली तरी गेली अनेक वर्षे व आजही सदर शेतजमीन सावकारग्रस्त मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात व वहिवाटीत व कब्जात आहे. त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी करीत महाराष्ट्र राज्य किसान सभेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी विविध मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. ही शेतजमीन जर सावकारांना विक्री केली तर सर्वच शेतकरी भूमिहिन होतात. या शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले अवैध कर्ज व व्याज परत केल्यानंतर सदर शेताची पुन्हा फेरविक्री संबंधीत शेतकऱ्यांचे नावे केली जाईल असे ठरले होते. मात्र शेतकऱ्यांकडून व्याज व मु्द्दलाची रक्कम सावकाराने वसूल केली व शेताची फेरविक्रीकरिता आणखी अतिरिक्त लाखो रूपये या सावकारांकडून मागितल्या जात आहे. सावकारांना जरी सावकारी पैशात शेताची विक्री करून दिली तरी शेत मूळ शेतकऱ्याच्या कब्जात, ताब्यात व वहिवाटीत आहे. सर्व शेतकऱ्यांनी नावे वहिवाटीदार म्हणून ६ ब मध्ये नोंद घेण्याबाबत तहसीलदार, हिंगणघाट, समद्रपूर, वर्धा यांना वर्षभरापूर्वी अर्ज केले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे किसान सभेने निवदेनातून म्हटले आहे. धरणे आंदोलनाकरिता यशवंत झाले, बाळकृष्ण तिमांडे, जगन चांभारे, आनंद पिदुरकर, आत्माराम कोळसे, देवीदास ढगे, घनश्याम डफ, बंडू बावणे, रामभाउ खेलकर, अट्टेल, देवेंद्र शिनगारे, गजानन काळे, मारोती खोकले, आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी झालेल्या सभेत यशवंत झाडे, महेश दुबे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, सिताराम लोहकरे, सुनिल घीमे, संजय भगत यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याची मागणी
By admin | Updated: October 19, 2016 01:33 IST