शेतकऱ्यांचे नुकसान : भरपाईसाठी प्रशासनाला साकडेहिंगणघाट : भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. सोबतच जोडधंदा म्हणून उन्हाळ्यात ते डांगराचे उत्पादन घेतात. यंदाही डांगराची पिके घेतली; पण पालिकेने विकत घेतलेला अस्थाई बंधारा फुटल्याने डांगराची शेतीच वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर नुकसानाची शासनाने भरपाई करावी, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाने केली आहे. याबाबत आ. समीर कुणावार यांना निवेदन देण्यात आले आहे. दरवर्षी भोई समाजातील शेतकरी रेती उपस्यामुळे पडलेले खड्डे बुजवून परंपरेनुसार डांगरवाडी लावतात. पालिका प्रशासन दरवर्षी धरणाचे पाणी हिंगणघाट येथील नागरिकांना पिण्यासाठी घेते. पालिकेकडे पाणी साठविण्याकरिता मजबूत यंत्रणा नाही. परिणामी, रेतीने भरलेल्या बॅगा टाकून अस्थाई स्वरूपाचा बंधारा बांधण्यात आला आहे. यावर्षी बंधाऱ्याला धरणाचे पाणी अडविता आले नाही. बंधारा एका बाजूने फुटला. यामुळे डांगरवाड्या बुडून डांगर सडले व वाड्या नष्ट झाल्या. शिवाय नागरिकांसाठी असलेले पिण्याचे पाणीही वाया गेले. यापूर्वी डांगरवाडी लावण्याकरिता तलाठी येत होते आणि कर घेत होते. गत ५ ते ६ वर्षांपासून कर घेणे बंद केले. असे असले तरी पारंपरिक व्यवसाय म्हणून भोई शेतकरी डांगराचे पीक घेत आहेत. भोई समाजाला डांगरवाडी, मासेमारी, चणे-फुटाणे आदी व्यवसायासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी. प्रत्येक जिल्ह्यात नियोजन करून डांगरवाडीसाठी पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती आल्यास १०० टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भोई समाजाच्यावतीने राज्यातील सर्व आमदारांना तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव मंत्रालय आदींना गतवर्षी देण्यात आले होते; पण कार्यवाही झाली नाही.आता पालिकेच्या बंधाऱ्यामुळे डांगरवाडीचे सुमारे आठ-दहा लाखांचे नुकसान झाले. यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आ. कुणावार यांना दिलेल्यास निवेदनातून करण्यात आली. निवेदन सादर करताना भोईसमाज क्रांती दल अध्यक्ष अशोक मोरे, तालुकाध्यक्ष धर्मदास गाडवे, सचिव रमेश ढाले, सचिन मोरे, रवी मोरे, गणेश पढाल, वसंता मोरे, वसंता ढाले, बाबाराव सुरजूसे, सूर्यभान कोल्हे, गोविंद कोल्हे, गणेश कापटे, विजय कापटे, अरुण निमसडे, अशोक कोल्हे, रामकृष्ण मोरे, मंगेश मोरे, वसंता मोरे, राजू मोरे, संजय किंटुकर, नाना निमसडे, भाऊराव मेसरे, शंकर मोरे, वंदना मेसरे, रूपेश राजूरकर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी) लावलेला खर्च गेला वायाभोई समाजातील शेतकरी दरवर्षी डांगराची शेती करतात. काही वर्षांपूर्वी या शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जात होता; पण पाच-सहा वर्षांपासून तोही वसूल केला जात नाही. असे असले तरी शेतकरी परंपरागत शेती करतात. यंदाही शेतकऱ्यांनी डांगराची लागवड केली; पण पालिकेचा बंधारा फुटल्याने डांगरवाडीच वाहून गेली. परिणामी, शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही वाया गेला. यातून उत्पन्न मिळाल्यास कुटुंबाला आधार झाला असता; पण हे पिकही वाया गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
बंधाऱ्याच्या पाण्यामुळे डांगराचे पीक गेले वाहून
By admin | Updated: May 29, 2016 02:18 IST