आकोली : चहा करताना अचानक गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने घरातील साहित्य भस्मसात झाले. यात घरातील रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्याचा कोळसा झाला. जळते सिलिंडर घराबाहेर फेकताना घरमालकाला किरकोळ दुखापत झाली़ ही घटना जामणी येथे सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमीचे नाव अनिल गव्हाळे असे आहे. नजीकच्या जामनी येथील अनिल रामाजी गव्हाळे यांच्या घरी सकाळचा चहा करताना सिलिंडरने भडका घेतला़ यात भडक्याने घरात लागलेल्या आगीने पाहता पाहता साहित्य भक्षस्थानी घेतले. यात आठवी व नववीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीचे व मुलांच्या शालेयसाहित्याचा कोळसा झाला. गॅस ओट्यालगतच कपाट असून कपाटातील रोख ४० हजार रूपये विमा कंपन्याची पॉलिसी, बॅक पासबुक व शेतीचे कागदपत्रे पूर्णत: जळाले़ घरातील कपडे, धान्य, मिक्सर, मोबाईल, फॅन, कुलरसह विजेची वायरींग जळून भस्मसात झाली़ पेटते सिलिंडर मोठ्या धाडसाने घराबाहेर काढताना अनिल गव्हाळे यांचा चेहरा भाजला़ घरातील अंथरून पांघरून व सर्व कपडे जळले असून फक्त अंगावरचे कपडेच तेवढे शिल्लक राहिले. भडका घेतलेले सिलिंडर इंण्डेन कंपनीचे असून कंपनीकडून मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनास्थळाला खरांगण्याचे ठाणेदार संतोष बाकल, तलाठी बाबा पांडे यांनी भेट दिली़ (वार्ताहर)
सिलिंडरचा भडका; एक जखमी
By admin | Updated: November 15, 2014 01:53 IST