वर्धा : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा यासाठी प्रत्येक गावात मतदार जागृती अभियान प्रभावीपणे राबवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे मतदार जागृती निरीक्षक विजयकुमार यांनी दिल्या. जिल्ह्यातील हिंगणघाट व देवळी विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती अभियानाचा आढावा केन्द्रीय निरीक्ष विजयकुमार यांनी घेतला. त्याप्रसंगी अकिधाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातही मतदारांना जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना करताना विजयकुमार म्हणाले, प्रत्येक तहसील तसेच मोठ्या गावांमध्ये मतदार सहाय्यता केंद्र सुरू करून मतदारांना मतदार यादीत असलेल्या नावाबाबतही तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी. जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती अभियानांतर्गत जिल्ह्यात आकर्षक होर्डिंग लावले असून मतदारांना मतदानाच्या तारखेसह संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. मतदार जागृती संबंधी जिल्ह्यातील महाविद्यालय तसेच महिला बचतगट आदींचा सहभाग घेवून प्रभावीपणे जागृती करावी असेही त्यांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक निरीक्षक विजयकुमार यांनी जनतेशी संवाद साधून निवडणुकी संदर्भात असलेली माहिती घेतली. तसेच येत्या १५ आॅक्टोबर २०१४ रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी हिंगणघाट मतदार संघात यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक व सर्वात कमी मतदान झालेल्या केन्द्राची माहिती दिली. ज्या केन्द्रावर कमी मतदान झाले अश्या केन्द्रावरील मतदारांना भेटून जागृती निर्माण करण्यात येईल असे सांगितले. तसेच समुद्रपूरच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे, दीपक करंगे, देवळीचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनीही माहिती दिली.
मतदानाच्या हक्काबाबत जागृती निर्माण करा
By admin | Updated: September 24, 2014 23:40 IST