कारंजा (घाडगे): सन २०१५ नंतर ज्या ज्या गावात निवडणूका होईल, त्या गावात मतदारानंतर लगेच एका तासाने मतमोजणी करून त्वरीत तसेच निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाचा विचाराधीन आहे. या संदर्भात तहसील कार्यालयात गुरूवारी सभा झाली. या सभेत निवडणूक प्रक्रियेतील हा बदल व्यवहार्य राहील किंवा नाही, यावर विचार विनिमय करण्याबाबत चर्चा झाली. निवडणूक आयोगाने शासनामार्फत तालुका स्तरावर पोलीस खाते, विद्युत खाते, तसेच महसूल खाते, आणि सर्व पक्षीय नेते आणि पत्रकाराची तातडीची सभा घेऊन मत मागितले आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार बालपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत या विषयावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान अनेकांनी हे शक्य नसल्याच्या प्रतिक्रीया दिल्या. या बैठकीत १ जानेवारी २०१५ ला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रवृत्त करावे. लग्न झालेल्या मुलींनी आपले नाव माहेरच्या यादीतून कमी करून सासरच्या गावात नोंदणी करावी. मृतकाची नावे यादीतून कमी करण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी, नवीन ठिकाणी नावे नोंदवावी. नावात, आडनावात, लिंग व नात्यात बदल झाला असेल तर विशिष्ट प्रपत्र भरून दुरूस्त करून घ्यावे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.या सभेला सभापती मोरेश्वर भांगे, उपसभापती पठाडे, माजी उपसभापती चौधरी, पंचायत समिती सदस्य संगीता खोडे, खवशी, भुतडा, तेजराव बन्नगरे, प्रा. अनिल भांगे, अभियंता वानखेडे उपस्थित होते. सभेचे संचालन नायब तहसीलदार राठोड यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
गावात मतदानाच्या दिवशीच मतमोजणी
By admin | Updated: November 29, 2014 01:56 IST