महाराष्ट्र कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे व बाजारपेठेच्या सुलतानी व्यवस्थापनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत अनिवार्य झाली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला बोनस देत सोयाबीनला एकरी मदत देण्याची मागणी महाराष्ट्र कृषक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत शुक्रवारी केली. शासनाच्या कृषी मुल्य आयोगाने ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हमीभावाची शिफारस केली. प्रत्यक्षात मात्र ४ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. यातील फरकाची रक्कम बोनसच्या स्वरूपात मिळावी. सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने एकरी अनुदान देण्यात यावे. कापूस व सोयाबीन पिकले नसल्याने बँकेचे कर्ज फेडता येणे अशक्य आहे, म्हणून संपूर्ण व सरसकट कर्जमुक्ती द्यावी. भूमिअधिग्रहण गोजी लघुपाटबंधारे प्रकल्पातील जमीन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे लाभक्षेत्रात सिंचनाची वाढ झाली असून प्रकल्पाची आवश्यकता नगण्य झाली. बुडीत क्षेत्रातील ४५७.५ एकर सुपिक व सिंचित जमीन पाण्याखाली जाण्यापासून वाचवावी, अशी मागणी करण्यात आली. यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्ही शेतकरी उग्र आंदोलन उभारतील असा इशारा देण्यात आला. आंदोलनाला राकॉच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य शारदा केने, जिल्हाध्यक्ष शरयु वांदिले, संजय काकडे, शशांक घोडमारे, बाबाराव झलके, संजय कामनापुरे, विद्या सोनटक्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कापसाला बोनस व सोयाबीनला एकरी मदतीची मागणी
By admin | Updated: November 7, 2015 02:05 IST