लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढली आहे. १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या काळात सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यातील कुठल्या भागात आढळले याचा बारकाईने अभ्यास जिल्हा प्रशासनाने केला असता, जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल २७ हॉटस्पॉट असल्याचे पुढे आले आहे. मागील सात दिवसाच्या काळात जिल्ह्यात ५५८ नवीन कोविडबाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश कोविडबाधित याच हॉटस्पॉट परिसरातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे २७ पैकी २१ हॉटस्पॉट एकट्या वर्धा तालुक्यात आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण असे ठिकाण निश्चित करून ते ठिकाण कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्ण असलेला परिवार गृह अलगीकरणात राहणार असून, त्या परिवारातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीतकमी २० व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय या परिसरातील नागरिकांवर सोशल पोलिसिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. सोशल पोलिसिंगमध्ये सामाजिक संस्था, पोलीस, महसूल, नगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी संशयित रुग्ण व आजारी व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहेत.
खासगी डॉक्टरांना लक्षणे असलेल्यांची करून घ्यावी लागेल कोविड टेस्ट वर्धा शहरसह ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांकडे कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण उपचार घेण्यासाठी आल्यास त्या रुग्णाबाबतची माहिती वर्धा नगरपालिकेने तयार केलेल्या लिंकवर दररोज टाकावी लागणार आहे. शिवाय ज्या रुग्णामध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत अशांनी कोरोना टेस्ट करावी, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्व खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत.