लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले. सर्व काही ठप्प झाले होते. त्यातच महागाईदेखील वाढली. त्यामुळे गृहिणींनी किचनपासून तर कटिंगपर्यंत खर्चात कपात केली. केवळ सकस आहारावरच जोर दिल्याचे गृहिणींशी संवाद साधताना लक्षात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंकफूड, बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाने वारंवार दिल्या. कोराेना विषाणू होण्यापासून वाचण्यासाठी सकस आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या जेवणात घ्या, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करून तसेच कोरोनाने सर्व काही ठप्प असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने गृहिणींचेही बजेट कोलमडले. त्या अनुषंगाने गृहिणींनी किचनमध्ये कॉस्टकटिंग करण्याला सुरुवात केली. तेलाचा वापर कमी केला, हॉटेलिंग बंद केले, इतकेच नव्हे तर घरातच विविध पदार्थ बनविल्याने खर्चकपात केल्याचे गृहिणींशी साधलेल्या संवादातून दिसून आले.
कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग
कोरोनात आरोग्य चांगले राहण्यासाठी तेलाचा वापर कमी केला. कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर जेवणात अधिक प्रमाणात करण्यात आला.पारंपरिक भाज्यांना अधिक महत्व देण्यात आले. हॉटेलिंग बंद केली. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्यात आले. इतकेच नव्हे तर घरातही तेलाचा वापर कमी करण्यात आला.मुला-बाळांच्या कटिंग घरच्या घरीच केल्या. इतकेच नव्हे तर पुरुषांनीदेखील दाढी घरीच केली. त्यामुळे त्याचाही खर्च वाचला. कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करणे टाळले.
हॉटेलिंग थांबविल्याने पैसे वाचले...
नैना प्राजक्त ढोबळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही दोघेच जण घरात राहतो. कोरोनामुळे कामाचा ताणही वाढला आहे. त्यातच खर्च कपातही करावी लागत आहे. कडधान्य आणि सकस आहारच दररोज जेवणात घेत आहे.
दोन्ही वेळ घेतला सकस आहार
प्रियंका हटवार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोरोनात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाहेरचे खाणे टाळले. दोन्ही वेळ सकस आहारच घेतला. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा अधिक वापर केल्याने किचनच्या साहित्यातही कपात झाली.