नयना गुंडे : डिसेंबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करणारवर्धा : अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयामुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात अडसर निर्माण झाला आहे. यापुढे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास साधत जिल्ह्याचे आघाडीपण कायम राखू, असा विश्वास नव्याने रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी संवादमध्ये व्यक्त केला.सीईओ गुंडे यांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव दांडगा आहे. १९९९ मध्ये त्यांनी उस्मानाबाद येथून उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. नंतर नाशिक, सोलापूर, सातारा जिल्ह्यात महत्त्वाची पदे भूषविली. बेस्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांचा शासनाने सन्मान देखील केलेला आहे. राजपत्रित अधिकारी संघटनेचे नेतृत्वही त्यांनी केलेले आहे. २००७ मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून म्हाडात कर्तव्य बजावले आहे. नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त नंतर वर्धेच्या सीईओ म्हणून नुकत्याच रूजू झाल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी संवादच्या माध्यमातून पत्रकारांशी वार्तालाप केला.सीईओ म्हणून पदाभार स्वीकारताच त्यांनी जिल्ह्याचे दौरे सुरू केले. वर्धा जिल्हा गोदरीमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. नुकतीच आर्वी येथे ग्रामसेवकांची बैठक घेऊन ग्रामसेवकांकडून हे ध्येय कधीपर्यंत पूर्ण करायचे, याची माहिती जाणून घेतली. असेच दौरे अन्य तालुक्यांमध्येही करणार असल्याचे गुंडे म्हणाल्या. वर्धा जिल्ह्यात ४७ हजार शौचालयाची गरज आहे. राज्यातील जे १० जिल्हे गोदरीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे, त्या जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोदिंयासह वर्धा जिल्ह्याचा समावेश असल्याची माहितीही गुंडे यांनी यावेळी दिली. पाणी विषयावर काम करण्यास जिल्ह्यात भरपूर वाव असल्याचेही त्या म्हणाल्या. ४४ गावांनी नळांना मीटर लावण्याचे प्रस्ताव पाठविले आहे. ही चांगलीच बाब आहे. याअनुषंगाने काम केले जाणार असून उमरी(मेघे) प्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावांत २४ बाय ७ योजना लागू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शासनाच्या योजना खूप चांगल्या आहे. अंमलबजावणी योग्य प्रकारे केलीत, तर अधिकाऱ्यांना नवीन काही करून दाखविण्याची गरज नाही. आपला कलही योजनांच्या अंमलबजावणीवर राहील, असेही सीईओ म्हणाल्या.(जिल्हा प्रतिनिधी)
पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधूनच विकास साधणार
By admin | Updated: June 15, 2016 02:35 IST