अदखलपात्र गुन्ह्याची नोंद : दुसरा विवाह काही कारणास्तव रद्दवर्धा : पत्नी असताना वर्धेतील एका मुलीशी प्रेमसंबध निर्माण करून तिच्याशी दुसरा विवाह केला. एवढेच नाही तर पहिल्या पत्नीला दुसऱ्या पत्नीबाबत अंधारात ठेवत दोघींनाही पुणे येथे एकाच घरात नांदविणाऱ्या देवळी तालुक्यातील इसमावर शहर ठाण्यात पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून अदखलपत्र गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार रविवारी उघड झाला. प्रफुल्ल भगत असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रानुसार, प्रफुल्ल हा पुणे येथे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तो वर्धेत असताना त्याचे यवतमाळ जिल्ह्यातील शिल्पा (काल्पनिक नाव) नामक युवतीशी सूत जुळले. या दोघांच्या लग्नाला घरून विरोध असताना दोघांनीही पळून जात पुणे येथे विवाह केला. मात्र त्या विवाहाची कुठे नोंदच नाही. त्यांचा १४ वर्षांच्या संसारात दोन अपत्य झाले. यात एक मुलगा व एक मुलगी आहे. दरम्यानच्या काळात त्याच्या वर्धेला चकरा झाल्या. यात वर्धेतील दीपा (काल्पनिक नाव) नामक युवतीशी सूत जुळले. तो तिला घेवून पुणे येथे गेला. यावेळी प्रफुल्ल याने शिल्पाला दीपाशी बहिणीचे नाते असल्याचे सांगत तिला अंधारात ठेवले. याच काळात त्याने दीपाशी विवाह उरकविल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान शिल्पाला प्रफुल्ल व दीपा या दोघांचा वर्धेत विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. यावरून तिने वर्धा गाठत सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांची भेट घेत कैफियत मांडली. यावरून त्यांनी तिला सोबत घेत शहर ठाणे गाठले. शिल्पासोबतच्या लग्नाची कुठलीही कायदेशीर नोंद नसल्याने गुन्हा दाखल करताना पोलिसही विचारात पडले. त्यांनी तक्रारीवरून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दीपा व प्रफुल्ल या दोघांनी दोन वर्षांपूर्वीच कायदेशीर विवाह केल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. शिवाय सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्लसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिल्पासोबत संसार करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. दीपा व प्रफुल्ल यांचा वर्धेत रविवारी होणारा विवाह काही कारणास्तव रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.(स्थानिक प्रतिनिधी)
दोघींना नांदविणाऱ्याविरूद्ध पोलिसांत तक्रार
By admin | Updated: May 23, 2016 02:06 IST